For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज वाहिन्यांत शॉर्टसर्किट; नऊ घरे खाक

04:49 PM Apr 09, 2025 IST | Radhika Patil
वीज वाहिन्यांत शॉर्टसर्किट  नऊ घरे खाक
Advertisement

एकंबे : 

Advertisement

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे मंगळवारी दुपारी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली. वस्तीतील नऊ कुटुंबीयांची घरे जळून खाक झाली, तर त्यालगत असलेल्या पाच शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वैरण पूर्णपणे जळाली. जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली.

चिमणगाव येथे उमेश बोधू राठोड हे सुमारे २५ वर्षापासून स्थायिक झाले आहेत. विजापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले राठोड हे मोलमजुरीचे काम करत असून त्यांनी आपल्या राज्यातून नऊ कुटुंबीय शेती व अन्य कामासाठी चिमणगाव येथे आणले आहेत. ही सर्वजण एकाच परिसरात घरे बांधून राहिले आहेत. या परिसराला लमाणवस्ती म्हणून ओळखले जाते. १६ झोपड्यांमध्ये ४० ते ५० लोक वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी लमाण वस्तीतील लोक गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे या वस्तीला आग लागली. बघता बघता सर्व घरे जळून खाक झाली. घराजवळ उभी असलेल्या दुचाकीदेखील  आगीच्या तडाख्यात सापडल्या. या वस्तीलगतच शेतकरी दत्तात्रय अंकुश भगत, अक्षय महादेव जाधव, अमित अशोक भगत, रमेश एकनाथ भगत, संजय तुकाराम भगत यांची वैरणीची गंज होती. त्यामध्ये साडेतीन हजार वैरणीच्या पेंड्या होत्या. या देखील जळून खाक झाल्या.

Advertisement

ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी तातडीने आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत आणि जरंडेश्वर शुगर मिल येथे दिली. ग्रामपंचायतीचा टँकर व अग्निशामक दलाच्या कर्मचायांनी आग आटोक्यात आणली. 

  • सुमारे ३५ लाखांचे नुकसान

एकूण लमाण वस्तीतील सर्व कुटुंबीयांची घरे पूर्णपणे जळाली असून त्यात सुमारे वीस लाख रुपयांचे त्याचबरोबर पाच शेतकऱ्यांचे पंधरा लाख रुपयांचे असे एकूण ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.