आगीत दुकान भस्मसात : पाच लाखांचे नुकसान
खानापूर जुन्या कोर्ट आवारातील घटना
खानापूर : येथील राजा छत्रपती चौकातील जुन्या कोर्ट आवारात असलेल्या दुकान गाळ्dयातील एका दुकानात शॉर्टसर्किटने आग लागून झेरॉक्स मशीन आणि बाँड लिखाणाचे साहित्य भस्मसात झाल्याची घटना गुऊवारी सायंकाळी सात वाजता घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यात राजू पुजारी यांच्या स्टेशनरी दुकानातील संगणक, झेरॉक्स मशीन यासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. खानापुरातील जुन्या कोर्ट आवारातील गाळ्यात राजू पुजारी यांचे दुकान आहे. यात बाँड लिखाणाचे काम तसेच स्टेशनरी साहित्य विक्री केली जाते.
या दुकानात तीन झेरॉक्स मशीन, दोन संगणक, प्रिंटर यासह स्टेशनरी साहित्य होते. रोजच्याप्रमाणे राजू यांनी सायंकाळी 6 वाजता दुकान बंद करून घरी गेले होत. 7 वाजता दुकानातून धूर आणि आगीचे लोळ दिसू लागल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला तसेच हेस्कॉमशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत संपूर्ण दुकान अवघ्या अर्ध्या तासात भस्मसात झाले. यात झेरॉक्स मशीन, टायपिंग मशीन, संगणक व प्रिंटर यासह इतर साहित्य आणि स्टेशनरी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
बाजूला असलेल्या नोटरी राम पारिश्वाडी यांच्या दुकानालाही आगीच्या झळा पोहोचल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. मात्र उपस्थित युवकांनी त्यांच्या दुकानातील साहित्य बाहेर काढल्याने नुकसान टळले आहे. खातेदार यांच्याही दुकानात आगीच्या झळा पोहोचल्याने त्यांच्याही थोडेफार नुकसान झाले आहे. अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. खानापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांना बाजूला केले. आग आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनीही मदत केली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.