विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला प्रारंभ
22 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जर्मनीतील म्युनिच येथे रविवारपासून सुरु झालेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल-पिस्तुल नेमबाजी स्पर्धेसाठी 22 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी झाला आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाजी संघात दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर तसेच ऑलिंपियन आणि विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेती ईशा सिंगचा समावेश आहे. मनू भाकर आणि ईशा सिंग हे नेमबाज सुरुवातीला वैयक्तिक पिस्तुल नेमबाजी प्रकारात भाग घेतील. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाजी संघात अनुभवी आणि नवोदित नेमबाजांचा समतोल राखला आहे.
जर्मनीची राजधानी म्युनिच येथे मंगळवारी महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकार घेतला जाणार आहे. तसेच याच दरम्यान 10 मी. एअर पिस्तुल पुरुष तसेच महिलांची 50 मी. रायफल थ्री पोझिशन बाद फेरी होणार आहे. त्यानंतर पुरुषांची 10 मी. एअर रायफल नेमबाजी पात्र फेरी घेतली जाईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 मी. एअर पिस्तुल पुरुषांची नेमबाजी आणि 10 मी. एअर रायफल पुरुषांची नेमबाजी या दोन क्रीडा प्रकारांची अंतिम फेरी होईल. या स्पर्धेमध्ये 80 देशांचे सुमारे 696 नेमबाज सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत यापूर्वी दोन वेळेला ऑलिंपिक स्पर्धेत तसेच माजी आशियाई स्पर्धेतील विजेती राही सर्नोबत ही भारतीय संघातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी महिला नेमबाज आहे. सम्राट राणा, रुद्रांक्ष पाटील, अनिश बनवाला, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, इला व्हेनिल, व्हॅलेरव्हेन, सुरुची सिंग आणि अर्जुन बबुता यांचा भारतीय संघात समावेश आहे. भारतीय संघात निवडण्यात आलेल्या नेमबाजांमध्ये महाराष्ट्राची 22 वर्षीय साक्षी पाडेकरला संधी देण्यात आली आहे. तसेच 18 वर्षीय सुरज शर्मा भारतीय संघातील सर्वात तरुण नेमबाज असून तो विश्वचषक स्पर्धेत प्रथमच सहभागी होत आहे. युद्धवीर सिधू पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे.