न्यूयॉर्कच्या नाईटक्लबबाहेर गोळीबार
10 जण जखमी, दहशतवादी हल्ला असणे शक्य
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्क या महानगरातील एका नाईटक्लबच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली असून 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपासकार्य करण्यात येत आहे. न्यू ऑर्लिन्स या शहरात नववर्ष साजरे करणाऱ्या गर्दीत कार घुसवून गोळीबार होण्याच्या घटनेनंतर एक दिवसाच्या आत घडलेली ही अमेरिकेतली तिसरी घटना आहे. न्यूयॉर्क शहराचे उपनगर असणाऱ्या जमैका येथे असलेल्या अमाझुरा नाईटक्लबच्या बाहेर बुधवारी रात्री अमेरिकेच्या वेळेनुसार साडेअकराला ही गोळीबाराची घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
सर्वजण किरकोळ जखमी
या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले सर्वजण धोक्याच्या बाहेर आहेत. कोणाच्याही वर्मावर गोळी लागलेली नाही. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याने सर्वजण वाचण्याच्या स्थितीत आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. न्यू ऑलिन्स येथील दहशतवादी हल्ला आणि न्यूयॉर्कमधील घटना यांचा परस्पर संबंध आहे काय याचा शोध घेतला जात आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केले. पाठोपाठ घडलेल्या दोन हल्ल्यांमुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण असून न्यूयॉर्कचा हल्लाही दहशतवाद्यानेच केला असावा, अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे. अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या हल्ल्यांचा निषेध केला असून कायदा-सुव्यवस्था कठोर करण्याचे संकेत दिले.
ट्रम्प यांच्या हॉटेलाबाहेर स्फोट
डोनाल्ड ट्रम्प वास्तव्यास असणाऱ्या लास वेगास येथील एका हॉटेलाबाहेरही गुरुवारी एका टेल्सा सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे. हे दहशतवादी कृत्य आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या तीनही घटनांमध्ये समान धागा आहे काय याचे अन्वेषण पेले जात आहे. अमेरिकेच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही कठोर उपायांचा अवलंब करु, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केले.