जॉर्डनमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर गोळीबार
हल्लेखोर कारवाईत ठार : तीन पोलीस जखमी
वृत्तसंस्था/ अम्मान
जॉर्डनमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तीन पोलीस जखमी झाले आहेत. तर प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला आहे. गोळीबाराची घटना राजधानी अम्मानच्या राबिया भागात घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. या हल्ल्यात आणखी कुणी सामील होते का याचा तपास आता पोलीस करत आहेत.
हल्लेखोराने पोलिसांच्या गस्त पथकावर गोळीबार केला होता, यात तीन पोलीस गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यावर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत हल्लेखोराचा शोध सुरू केला होता. गोळीबार झालेल्या भागातच इस्रायलचा दूतावास आहे. या भागात इस्रायलच्या विरोधात अनेकदा निदर्शने होत असतात. अलिकडच्या काळात येथे लोकांनी इस्रायलच्या हमास अन् हिजबुल्लाह विरोधातील कारवाईच्या विरोधात निदर्शने केली आहेत. गोळीबाराच्या घटनेचा इस्रायलशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जॉर्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर पॅलेस्टिनी वंशाचे लोक राहतात. पॅलेस्टिनी वंशाच्या लोकांची जॉर्डनमधील संख्या 1 कोटी 20 लाखापेक्षा अधिक असू शकते. 1948मध्ये पॅलेस्टाइनमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले असता हे लोक जॉर्डनमध्ये येऊन स्थायिक झाले होते. याचमुळे इस्रायलच्या गाझा आणि लेबनॉनमधील कारवाईवरून येथील लोकांमध्ये मोठा संताप आहे. जॉर्डनच्या सरकारने इस्रायलसोबत शांतता करार केला होता, यावरूनही पॅलेस्टिनी वंशाच्या लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शांतता कराराला पॅलेस्टिनी वंशाचे लोक स्वत:च्या अधिकारांबद्दलची फसवणूक मानतात.