व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना
सुरक्षा दलांनी संशयिताला गोळ्या घालून केले ठार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसजवळ एका संशयिताने अंदाजे 30 गोळ्या झाडत हाहाकार माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 ते 5 च्या दरम्यान घडली. या गोळीबारावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराने व्हाईट हाऊसजवळील एका सुरक्षा चौकीवर गोळीबार केला. याप्रसंगी त्याठिकाणी अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी तैनात होते. प्रत्युत्तरात अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर जायबंदी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख अमेरिकेतील मेरीलँडचा रहिवासी असलेला 21 वर्षीय नासिर बेस्ट अशी पटली आहे. या गोळीबारात एक नागरिकही जखमी झाला आहे. त्याला हल्लेखोराची गोळी लागली की प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
ट्रम्प यांच्या कन्येलाही धमकी
या गोळीबाराच्या घटनेच्या काही तासांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मुलीलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या प्रकरणात एका इराकी तरुणाला अटक करण्यात आली. तो इराणी लष्कराशी संबंधित होता. आरोपीकडे इव्हांका आणि तिचा पती जेरेड कुशनर यांच्या फ्लोरिडा येथील घराचा आराखडा (ब्लूप्रिंट) देखील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.