अमेरिकेच्या शाळेत गोळीबार, 4 ठार
9 हून अधिक जण जखमी : पोलिसांकडून एका आरोपीला अटक
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
अमेरिकेच्या जॉर्जियाच्या अपालाची हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या गोळीबाराप्रकरणी 14 वर्षीय मुलाला अटक केली आहे. हा मुलगा याच शाळेचा विद्यार्थी आहे. गोळीबाराची घटना विंडर शहरात घडली असून ते प्रांतीय राजधानी अटलांटापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर शाळेत पोहोचलेल्या पोलिसांसमोर हल्लेखोराने आत्मसमर्पण केले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये 2 शिक्षक आणि 2 विद्यार्थी सामील आहेत. हल्लेखोराचे नाव कोल्ट ग्रे असून त्याच्यावर आता एका प्रौढाप्रमाणे खटला चालणार आहे.
कोल्ट ग्रेबद्दल पोलिसांना संशय होता, याचमुळे मागील वर्षी मे महिन्यात एफबीआयने त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली होती. कोल्ट ग्रेने मागील वर्षी सोशल मीडियावर मास शूटिंगची धमकी दिली होती. परंतु तेव्हा त्याला अटक करण्यात आली नव्हती. आमच्याकडे शिकारीसाठी बंदूक असून त्यावर आमची नेहमीच नजर असते असे कोल्टच्या वडिलांनी चौकशीदरम्यान सांगितले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर प्रशासनाने बॅरी काउंटी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद केल्या आहेत. खबरदारीदाखल जिल्ह्यातील सर्व हायस्कूल्समध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अपालाची हायस्कूलमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहेत. जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांनी प्रांताच्या यंत्रणांना त्वरित मदतकार्य राबविण्याचा निर्देश दिला आहे.