मेक्सिकोत गोळीबार, 10 जणांचा मृत्यू
मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेंट्रल मेक्सिकोमधील एका बार-रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी बंदूकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला. गोळीबारानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे तपास अधिकाऱयांनी सांगितले. प्राथमिक तपासात ही घटना गँगवॉरमधून घडल्याचे निदर्शनास आले आहे. मागील चार महिन्यातील ही गोळीबाराची पाचवी मोठी घटना होती. मे महिन्यातही अशीच घटना घडली होती.
सेंट्रल मेक्सिकोतील स्टेट ऍटर्नी जनरल ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल मेक्सिकोमध्ये मार्च महिन्यात 19 लोकांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. अनेकजण जखमी होते, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली होती. येथील सरकारने डिसेंबर 2006 मध्ये वादग्रस्त लष्करी अंमली पदार्थविरोधी ऑपरेशन सुरू केल्यापासून मेक्सिकोमध्ये 3 लाख 40 हजार जणांची हत्या झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.