शिकागोत गोळीबार; चार ठार, 14 जखमी
वृत्तसंस्था/शिकागो
अमेरिकेतील शिकागोमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. एका रॅपरच्या पार्टीत हा हल्ला झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर तेथून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना रिव्हर नॉर्थ परिसरातील आहे. शिकागोमध्ये एका रॅपरच्या अल्बम रिलीज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रेस्टॉरंट आणि लाउंजबाहेर बरेच लोक जमल्यानंतर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गाडीतूनच गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर ते गाडी घेऊन पळून गेले. या हल्ल्यात 21 ते 32 वयोगटातील 13 महिला आणि 5 पुरुषांना गोळ्या लागल्या आहेत. यापैकी दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तथापि, पोलिसांना अद्याप त्यांच्याबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही.