बारबाला नाचवणाऱ्या युवकांवर गोळीबार
सातारा, पाचगणी :
गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात कास (ता. जावली) येथील जयमल्हार हॉटेलमध्ये बारबाला नाचवून डोकी फोडून, गाड्याची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणात पाच जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुह्यातील दोन युवकांवर सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोंडवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ फायरिंग करण्यात आले. यात दोघेही जखमी झाले आहेत. अमर गणेश पवार (वय 21, मोळाचा ओढा सातारा), श्रेयस सुनिल भोसले (वय 21, रा. तामजाईनगर सातारा) अशी त्यांची आहेत. त्यांच्यावर धीरज शेळके, तुषार पवार यांनी फायरिंग केल्याची माहिती जखमी युवकांनी पोलिसांनी दिली.
मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्यावर फायरिंग झाले ते अमर गणेश पवार व श्रेयस सुनील भोसले यांना मेढा कोर्टातून बारबाला छम छम प्रकरणात जामीन झाला होता. मेढा पोलीस ठाण्यामध्ये त्यांना प्रिव्हेंटिव्ह कारवाईसाठी हजेरी लावण्याकरिता दोघेही आले होते. मेढा पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी हजेरी लावून ते गेले. त्यानंतर साताराच्या दिशेने जात असतानाच छम छम बारबाला प्रकरणातील फिर्यादी धीरज शेळके आणि तुषार पवार व बारबाला छम छम प्रकरणातील आरोपी अमर पवार व श्रेयस भोसले यांची नजरानजर झाली आणि तिथूनच दुचाकीवरून पाठलाग सुरू झाला. हा पाठलाग थेट कोंडव्याच्या दिशेने येताच पाठीमागून तुषार आणि धीरजने थेट पिस्तूलमधून बेछूट गोळीबार केला. यातच अमर पवार याच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याचबरोबर श्रेयस भोसले देखील जखमी झाला असल्याची माहिती समोर आली.
कास पठारावरील छम छम बारबालाचे प्रकरण गेल्या एक महिन्यापासून गाजत आहे. यामध्ये मेढा पोलीस ठाण्याची पृथ्वीराज ताटे यांना देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारणे दाखवा नोटिसाला सामोरे जावे लागले व त्यानंतर थेट बदली कारवाईला देखील सामोरे जावे लागले. ते प्रकरण ताजे असतानाच बारबाला छम छम प्रकरणातील आरोपी आणि फिर्यादी यांचा सातारा तालुक्याच्या कोंडवे हद्दीमध्ये झालेल्या गोळीबाराने कोंडवे परिसरासह संपूर्ण सातारा शहर हादरले.
घटनेतील दोघांना तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती तात्काळ तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, डीवायएसपी राजीव नवले व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
- घटना सीसीटीव्हीत कैद
पेट्रोल पंपाच्या शेजारी एक दुकान आहे. या दुकानाबाहेर सीसीटीव्ही आहे. अमर पवार व श्रेयस भोसले यांच्यावर हल्ला करणारे धीरज शेळके व तुषार पवार हे दोघेही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांचा ही शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
- पार्टीच्या वादातून दोघांवर फायरिंग
गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात कास येथील जयमल्हार हॉटेलवर अमर पवार, श्रेयस भोसले व अन्य तीन जणांनी रात्रीच्या सुमारास बारबाला नाचवून पार्टी केली. या पार्टीत वाद झाला. या वादात काही युवकांना मारहाण करून त्यांची डोकी फोडण्यात आली. तर गाड्याही फोडल्या. या प्रकरणी तरुण भारतने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करताच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात अमर व श्रेयसवर ही गुन्हा दाखल दाखल आहे. याच पार्टीतून दोघांवर फायरिंग झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
- जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना वाढू लागल्या
गेल्या 2 वर्षात सातारा जिह्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून आरोपींचा ठाव घेत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही असामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.