पर्वरीतील मॅजेस्टिक प्राईडच्या संचालकावर गोळीबार; दोघे हल्लेखोर पसार ;गोव्यामध्ये खळबळ
म्हापसा : पर्वरीतील मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोघा हल्ले खोरांनी गोळबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हल्ला केल्यानंतर दोघांनीही घटनास्थळावरुन धावत पोबारा केला. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला असून महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांची मोठी फौज मॅजेस्टिक हॉटेलच्याबाहेर तसेच आतमध्ये चौकशीच्या कार्यात गुंतली होती. सीसीटीव्ही कॅमेरावरुन पोलिसांना बरेच धागेदोरे सापडले आहेत.
ज्या दोघा हल्लेखोरांनी श्रीनिवास नायक यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या ते दोघेही सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटाने घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते दोघेही हॉटेलमध्ये येऊन श्रीनिवास यांच्या हॉटेलमध्ये येण्या-जाण्याच्या वेळा व अन्य हालचालींबाबत रेकी करत होते.
हल्ला केल्यानंतर दोघेही धावत सुटल्याचे सीसी टीव्ही कॅमेरात दिसत असून सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी खुर्ची उभारुन सुरक्षा रक्षकावर मारुन पळ काढण्यात यशस्वी झाले. एक हल्लेखोर महामार्गावरुन पणजीच्या दिशेने धावला असून दुसरा हल्लेखोर मराठी भवनसमोरील अंतर्गत रस्त्यातून पळाला आहे. दोघाही हल्लेखारांची छायाचित्रे पोलिसांच्या हाती लागली असून त्याद्वारे शोध सुरु करण्यात आला आहे.
याबाबत पर्वरी पोलिसांना माहिती मिळताच पर्वरी पोलिस तसेच पोलिस उपमहानिरीक्षकही घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध घेणे सुऊ होते.