ऑस्ट्रियात शाळेत गोळीबार, अनेक ठार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रिया या देशातील ग्राझ शहरात एका शाळेत झालेल्या गोळीबारात विद्यार्थ्यांसह अनेकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची संख्या नेमकी किती यासंबंधी अद्याप माहिती देण्यात आली नाही. तसेच या हल्ल्याचे नेमके कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, हा दहशतवादी हल्ला असे गृहित धरुन तपास करण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळेच्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून लोकांना या भागात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
ग्राझ हे ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. त्याची लोकसंख्या तीन लाख आहे. ते या देशाच्या आग्नेयेस असून ते एक औद्योगिक केंद्र असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. असा हल्ला होण्याची ही या शहरातील पहिलीच वेळ असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. अनधिकृत वृत्तानुसार या गोळीबारातील मृतांची संख्या 15 हून अधिक आहे. ऑस्ट्रिया सरकारने या हल्ल्याच्या चौकशीचा आदेश दिला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या हल्ल्यासंबंधी निश्चित माहिती प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते त्यावेळीच हा हल्ला झाल्याने जीवितहानी अधिक झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात दुखवटा घोषित झाला आहे.