‘शूटर क्वीन’...मनू भाकर !
टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या अभूतपूर्व पराक्रमाचा चेहरा राहिला होता तो भालाफेकपटू नीरज चोप्रा...त्याची स्पर्धा व्हायची असली, तरी आतापर्यंतच्या आपल्या कामगिरीवर ठसा राहिलाय तो नेमबाज मनू भाकरच्या ऐतिहासिक पराक्रमाचाच...एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी पहिलीवहिली भारतीय बनून तिनं इतिहासाच्या पुस्तकातील आपलं स्थान निश्चित केलंय...
गोष्ट तीन वर्षांपूर्वीच्या टोकियो ऑलिम्पिकची...10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी झाल्यानंतर ती अश्रू अनावर झालेल्या स्थितीत ‘शूटिंग रेंज’मधून लगबगीनं बाहेर पडतानाचं चित्र अनेक ऑलिम्पिकप्रेमींना आजही आठवत असेल...पदार्पणातलं ऑलिम्पिक, त्यामुळं गाडी ऊळावरून घसरल्याचं अन् हातून खराब कामगिरी होऊन पदकावर पाणी सोडावं लागल्याचं दु:ख जास्त...त्यातच पात्रता फेरीत धमाकेदार सुऊवात करूनही गती गमावण्याचा प्रसंग ओढवला तो पिस्तूल बिघडल्यानं. खराब झालेला तुकडा बदलून ती परतली खरी, पण तोवर लय बिघडली होती. शिवाय या तांत्रिक अडथळ्यानं सहा मौल्यवान मिनिटं वाया घालविली. वेळेशी शर्यत करत राहिलेले शॉट्स पूर्ण करण्याचं आव्हान दबाव प्रचंड वाढविण्यास पुरेसं ठरलं...
2024...टोकियातला अनुभव मागं ढकलून पॅरिसपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या चॅटॉरॉक्स या आर्मी टाऊनमधील ‘शूटिंग रेंज’मध्ये त्याच 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ती उभी ठाकली. तिचा सामना होता दक्षिण कोरिया व चीनमधील उच्च दर्जाच्या दोन-दोन नेमबाजांशी. परंतु विश्वविजेत्या आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या गराड्यात असून देखील ती डगमगली नाही. वेळ आल्यावर तिनं शांतपणे आपलं कौशल्य पणाला लावत दबावाला तोंड दिलं (त्याचं दर्शन भारतीय नेमबाजांना अलीकडच्या काळात मोठ्या मंचावर दाखवताना आलेलं नाहीये)...शेवटचा नेम धरत सराईतपणे ‘ट्रिगर’ दाबल्यानंतर ‘फायरिंग पॉईंट’वर तिची पहिली प्रतिक्रिया राहिली ती रौप्यपदक केवळ 0.1 गुणांनी हुकल्याची..पण सेकंदभरात तिला आपल्या हातून काय प्रताप घडलाय याची जाणीव झाली. कांस्यपदक निश्चित असल्याचं कळल्यावर तिचा चेहरा खुलला...
मनू भाकर...सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वसामान्य भारतीयांपर्यंत साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनलेलं नाव...ही 22 वर्षीय तरुणी भारताची ऑलिम्पिकमधील पाचवी पदकविजेती बनलीय. त्या यादीतील अशी कामगिरी करून दाखविणारं हे सर्वांत तरुण नाव...2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमार नि गगन नारंग यांनी पदकप्राप्ती केल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी तो मान पुन्हा आपल्या वाट्याला आलाय...
अन् हे कमी म्हणून की काय लगेच सरबजोत सिंगसमवेत 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक स्पर्धेत आणखी एका कांस्याची खात्यात भर. त्यासरशी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू बनत मनूनं इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक नवा अंक जोडला (कोलकाता इथं 1875 साली जन्मलेल्या नॉर्मन प्रिचर्डनं 124 वर्षांपूर्वी म्हणजे 1900 मध्ये पॅरिस इथंच भारतातर्फे दोन रौप्यपदकं कमावली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं मात्र ही दोन पदकं टाकलीत ती ब्रिटनच्या खात्यात)...
टोकियो ऑलिम्पिकनंतर नेमकं काय घडलं ?...नेमबाजीत एकही पदक जिंकू न शकलेल्या भारतीय संघाच्या अपयशाचा मनू भाकर ही चेहरा बनली...10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र गटात मनू अन् सौरभ चौधरीवर पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल स्थान मिळवूनही शेवटी प्रसंग आला तो सातव्या स्थानावर राहण्याचा...तिची ऑलिम्पिक मोहीम संपली ती 25 मीटर एअर पिस्तूलनं. त्यात देखील तिला अंतिम फेरी गाठता आली नाही...पुढं मनू भाकर अन् तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचं उघडपणे आणि अत्यंत कडवट पद्धतीनं वाजलं...एक आशादायक कारकीर्द उभरतानाच मावळण्याची चिन्हं दिसू लागली...
टोकियोतील धक्का ह्रदयभंग करणारा, मानसिकदृष्ट्या कोलमडून टाकणारा होता...मग मनू भाकरला नेमबाजीचाच कंटाळा येऊ लागला. वयाच्या 14 व्या वर्षी पिस्तूल उचलण्यासाठी तिला प्रेरणा देणारा तो ‘स्पार्क’ गायब झाल्यासारखं वाटू लागलं. ती भारतीय राष्ट्रीय संघाचा भाग असली, तरी सर्वोच्च स्तरावर पदकं ज्ंिांकून जगात सर्वोत्कृष्ट ठरण्याच्या इच्छेला मात्र ओहोटी लागली...‘2022 मध्ये तसंच 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत मला असं वाटू लागलं की, हे माझ्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंतच्या कामासारखं रहाटगाडगं झालंय आणि मला त्याच त्याच गोष्टी दररोज, पुन्हा पुन्हा करणं आवडत नाहीये. त्यामुळं मला ते कंटाळवाणं वाटू लागलं...मग मला असंही वाटू लागलं की, ब्रेक घेण्याची हीच योग्य वेळ असून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलेलं, कॉलेजमध्ये गेलेलं किंवा काही काळ परदेशात शिक्षण घेतलेलं बरं’, पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनूनं त्या काळाच्या आठवणींना दिलेला उजाळा...
तरीही मनू भाकरनं जिद्द सोडली नाही, नेमबाजीला सोडचिट्ठी दिली नाही...आणि तेव्हाच तिनं निर्णय घेतला तो माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांना फोन कॉल करण्याचा. तिला पुन्हा एकदा जोडी जमवायची होती. राणांनीही नकार दिला नाही हे महत्त्वाचं...हे सोपं नव्हतं...कारण टोकियो ऑलिम्पिकनंतर एक वर्षाहून अधिक काळ त्या दोघांमध्ये संवाद झाला नव्हता. जपानमध्ये सहन कराव्या लागलेल्या धक्क्यासाठी मनू भाकरनं जसपाल राणांना जबाबदार धरलं. राणाही तिला फक्त अपरिपक्व म्हणून थांबले नाहीत, तर मनूच्या आईनं पाठवलेला संदेश आपल्या टी-शर्टवर छापून आणि ‘शूटिंग रेंज’मध्ये तो परिधान करून फिरून त्यांनी तिची थट्टा उडविली...
‘मी 2021 मध्ये सर्वत्र हरले. संपूर्ण 2022 सालातही संघर्ष करावा लागला आणि 2023 च्या सुरुवातीच्या काळात चालू राहिली ती अशीच स्थिती’, मनू भाकर सांगते...पॅरिस ऑलिम्पिक जवळ आल्यावर तिला जाणवायला लागलं की, तिच्या हातून चांगली कामगिरी घडलीय ती फक्त जसपाल राणासमवेत...त्यापूर्वी तिला चार वेगवेगळ्या प्रशिक्षकांनी प्रशिक्षित केलं होतं. ते सर्व राष्ट्रीय नि आंतरराष्ट्रीय विजेते राहिलेले असले, तरी राणा हेच आपल्याला सर्वोत्कृष्ट पातळीवर पोहोचवितात, आपला आत्मविश्वास वाढवतात असं तिला वाटू लागलं...
मनूला तिच्या जवळच्या अनेक लोकांनी सल्ला दिला होता तो पुन्हा जसपाल राणांच्या भानगडीत न पडण्याचा. कारण ते स्पष्टवक्ते अन् निरर्थक गोष्टी खपवून न घेणारे म्हणून प्रसिद्ध...कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ देखील लवकर संपुष्टात आला होता. खरं तर त्यांच्या त्या कार्यकाळातच अनेक जागतिक दर्जाचे नेमबाज उदयाला आले आणि त्यामध्ये मनू भाकरचाही समावेश होतो...तरीही तीन वर्षांनंतर मनू व राणा एकत्र आले आणि त्याचा परिणाम आता सर्वांना स्पष्ट दिसतोय...मागील रविवारी तिनं अंतिम फेरीच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा पहिला दृष्टिक्षेप टाकला तो राणांवरच...प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी ती त्यांच्याकडे पाहायची...‘माझी नजर फक्त फक्त त्यांच्यावर पडेल, इतर कोणावरही नाही याची मी काळजी घेत होते. कारण त्यांना बघून मला धीर येतो’, मनू भाकरची ही वाक्यं आता सर्वांना शब्दश: पटतील !
...अन् तिनं पिस्तूल उचललं !
- 18 फेब्रुवारी, 2002 रोजी बॉक्सिंग नि कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या हरयाणातील झाज्जर इथं जन्मलेल्या या नेमबाज तरुणीला राणी लक्ष्मीबाईचं ‘मनू’ हे नाव दिलं ते तिची 84 वर्षांची आजी दया कौर यांनी...भाकर कुटुंबाची खासगी शाळा असून तिथंच तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय...मनूचे आजोबा राजकरण भाकर हे देखील नेमबाजच होते...
- मनू भाकरनं सुरुवातीला टेनिस, स्केटिंग, बॉक्सिंग अशा अनेक खेळांमध्ये हात आजमावून पाहिला. शिवाय मार्शल आर्ट ‘थांग ता’मध्ये तर तिनं अनेक राष्ट्रीय स्तरावरील पदकं देखील जिंकली...
- सारं चक्र 360 अंशांत फिरलं ते 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकनंतर...14 वर्षांच्या मनूचं अचानक पिस्तूलवर प्रेम जडलं. तिच्या प्रत्येक बाबीचं नेहमीच समर्थन करणारे वडील रामकिशन भाकर यांनी तिला वेळ न गमावता ‘गन’ आणून दिली अन् त्यांचा निर्णय अजिबात चुकला नाही...
पॅरिसमधील अन्य पराक्रम...
- 2004 च्या अथेन्समधील खेळांतील सुमा शिरूरनंतर मागील 20 वर्षांतील ऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला...
- ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज....
- एअर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पिक पदक खात्यात जमा करणारी पहिली भारतीय खेळाडू...
- ऑलिम्पिकच्या सांघिक गटात पदक पटकावणारी पहिली भारतीय नेमबाज जोडी (मनू नि सरबजोत सिंग)..
- वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही गटांतील स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक पदकांची कमाई करणारी पहिली भारतीय खेळाडू...
ऑलिम्पिकच्या आधीचं महत्त्वपूर्ण यश...
- 2023 : चीनमधील आशियाई खेळांतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूलच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदक...
- चांगवॉन येथील आशियाई नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूलमध्ये पाचवा क्रमांक, त्याच्या जोरावर पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित...
- 2018 - अर्जेन्टिनात झालेल्या युवा ऑलिम्पिक खेळांत 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक. त्यामुळं ती ठरली युवा ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणारी पहिलीवहिली भारतीय खेळाडू...
- ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत नवीन राष्ट्रकुल विक्रमासह सुवर्णाची कमाई... (याशिवाय विविध जागतिक स्पर्धांत एकेरी व मिश्र गटांमध्ये सुवर्णासह विविध पदकांची कमाई)...
- राजू प्रभू