For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री निकटवर्तीयांना तिकीट वाटपात धक्के!

06:05 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री निकटवर्तीयांना तिकीट वाटपात धक्के
Advertisement

उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या खासदार, माजी खासदार मंडळीपैकी अनेकांना तिकीट नाकारले जाईल. काहींना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल अशी शक्यता हे खासदार फुटले तेव्हाच या स्तंभात वर्तवली होती. गजानन कीर्तिकर, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे यांच्यासह उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीपुत्राला कल्याण सोडून ठाणे लढवावे लागेल असे दिसते. ज्या सात खासदारांनी तिकीट पटकावले त्यांच्या वाट्यालाही मोठा संघर्ष आला आहे.

Advertisement

   कोल्हापूरला काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी देऊन महाराष्ट्रातील सर्व पक्षांना पेचात टाकले. ठाकरे सेनेने कोल्हापूरवरील हक्क सोडला तर आता भाजप हा मतदारसंघ शिंदेंकडून काढून घेऊन कागलचे घाटगे किंवा महाडीक महाराजांच्या विरोधात उभे करतील असे वातावरण झाले. मात्र यामुळे आपले राजकारण कायमचे धोक्यात येऊ शकते हे ते जाणून होते. अखेर शिंदेंचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यांनी भाजपच्या सर्वेवर तोंडसुख घेतले. गोविंदराव पानसरे, एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर कोल्हापूरचे ज्येष्ठत्व संपले अशी भावना आहे. अलीकडेच घडवलेल्या जातीय दंगलीमुळे इथले वातावरण बदलले आहे. त्यामुळेच शाहू महाराजांच्या ज्येष्ठत्वाला महत्त्व प्राप्त झाले. वंचितनेही शाहूंना पाठिंबा देऊ केला. या घटनेचा प्रभाव सातारा, सांगली, हातकणंगलेवरही पडणार आहे. साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी करण्यास नकार देणे आणि उदयनराजे यांच्या उमेदवारीस भाजपकडून विलंब लावला जाणे, पवारांनी साताऱ्याची उमेदवारी विचारपूर्वक देणार, विलंब लागेल असे जाहीर करणे हा कोल्हापूर प्रभावाचाच दबाव आहे. मंडलिकांप्रमाणेच हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी आपली उमेदवारी वाचवली याचे कारणही मराठा फॅक्टरमध्येच आहे. त्यांची लढत राजू शेट्टी यांच्याशी आहे. शेट्टी यांना पाठिंबा चालेल पण आघाडीत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे सेना उमदेवार शोधत आहे. भाजप आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल त्यांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत. इथे मराठा - जैन वादावर मतदान होते की शेट्टींना शेतकरी नेता म्हणूनच पाहिले जाते हेही ठरेल. मात्र मराठा फॅक्टरमुळे माने यांना उमेदवारी मिळाली हे नक्कीच. शिंदेंनी जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी बुलडाणा प्रतापराव जाधव, हिंगोलीचे हेमंत पाटीलही त्यामुळेच तरले. अन्यथा नोकरशहा मोपलवार यांच्यासाठी भाजप हिंगोली आपल्याकडे ठेवण्यास इच्छूक होती. शिंदेसेनाही धनुष्यबाण चिन्हावर त्यांना लढवण्यास तयार होती. प्रतापराव जाधव यांना शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनीच विरोध करून स्वत:चा अर्ज भरला आहे. ही धुसफूस वाढीस लागली आहे. ठाकरे सेनेने हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांना उतरवले आणि हेमंत पाटलांचे पूर्वीचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष असणे त्यांच्या उपयोगी पडले. तसे झाले नसते तर परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि बीड इथे आधीच जरांगे फॅक्टर त्यात या मराठा उमेदवारांना डावलण्याचे राजकारण महागात पडले असते.  हे जाणून निर्णय झाले. मावळात श्रीरंग बारणे किंवा दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांच्या बाबतीत ही अडचण आली नाही. पण, ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे दिग्गज बारणेंना टक्कर देताना पवार, शेका पक्ष आणि कोकणपट्टा कसा साथ देतो यावर ही लढाई अटीतटीची होईल. राहुल शेवाळे यांची लढत अनिल देसाई या ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांशी होणार असली तरी इथे काँग्रेस, मनसे फॅक्टरसुध्दा महत्त्वाचा आहे. शिवसेना भवन ते चेंबूर या भागात ही लढत लक्षवेधक असेल. शिर्डीत शिंदेंच्या खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या विरोधानंतर पण तिकीट दिले गेले. त्यामुळे रामदास आठवले भाजपवर नाराज झाले. आता विखे पाटलांना खा. सुजय आणि शिर्डीत लोखंडे दोघांना निवडून आणण्यासाठी झटायचे आहे. आ. निलेश लंके यांचे इथे आव्हान असेल तर लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब वाघचौरे हे माजी खासदार ठाकरेंचे उमेदवार असतील. गंमतीचा भाग म्हणजे विखे यांचे परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांचा इथे उमेदवार नसून ठाकरे आणि पवार यांच्यासाठी त्यांना शक्ती लावायची आहे.

शिंदेंचे सात खासदार नशीबवान ठरले मात्र त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याणमध्ये भाजपचा विरोध आहे. त्यांची उमेदवारी जाहीर करता आली नाही. ठाकरेंनी तिथे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केली तर ठाण्यात राजन विचारेंनी आपल्या विरोधात भाजप आणि शिंदेसेनेकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध करा असा चिमटा काढला. आनंदराव अडसूळ इच्छा बाळगून होते की, नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. तेव्हा उमेदवारी आपल्याला मिळेल. पाहिजे तर कमळावर लढू. बच्चू कडूही विरोधात होते. तरीही भाजपने त्यांना जुमानले नाही. नवनीत राणा यांना भाजपचे तिकीट मिळाले आणि त्यांनी स्वत:च्या पतीच्या पक्षाचा राजीनामा देऊन ही उमेदवारी घेतली. विरोधी मंडळींच्या जखमेवर हे मीठ होते. नाशिकचे हेमंत गोडसे आपल्याला फसवल्याची भाषा करत आहेत. ती जागा अजित पवारांना जाऊन छगन भुजबळ उमेदवार होऊ शकतात. ठाकरेंनी तिथे आधीच उमेदवार जाहीर केल्याने गोडसेंना वाट नाही. गजानन कीर्तिकर हे सेनेचे ज्येष्ठ नेते. ते शिंदेंकडे गेले. त्यांचा पुत्र ठाकरे सेनेचा उमेदवार आहे. तिथे अभिनेता गोविंदाला शिंदे यांनी प्रवेश दिला. पण भाजप इथे आपला उमेदवार उभा करेल असे वातावरण असल्याने गोंधळच वाढला. कृपाल तुमाने सेनेचे ज्येष्ठ खासदार मात्र रामटेकमधून त्यांना धक्का देऊन काँग्रेसमधून आलेल्या राजीव पारवे यांना भाजपच्या इशाऱ्याने प्रवेश आणि उमेदवारी द्यावी लागली. काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र आणि उमेदवारी रद्द केली गेली. काँग्रेसचे सुनील केदार नागपूर शेजारचा हा मतदार संघ जिंकून देतील अशी आशा होती. आता बर्वे यांचे पती किंवा पूर्वीचे पण सध्या वंचितचे उमेदवार किशोर गजभिये यांच्यावर एकमत होते का ते समजेलच. यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांना तिकीट मिळणार नाही. तिथे मंत्री संजय राठोड, त्यांच्या पत्नी किंवा राष्ट्रवादीच्या मोहिनी इंद्रनील यांचे नाव चर्चेत आहे. महादेव जानकर यांना बारामती आणि माढामधील पवारांचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा जोडून घेतले त्यांनाही शब्द दिलाय. माढा आणि बारामतीची लढाई मोठी आहे पवार सहजी हार मानणार नाहीत हे माहिती आहे. त्यात त्यांनी माढामध्ये मोहिते पाटील परत मिळवले. इतर नाराजांशी संपर्क ठेवला आणि दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांनाही जोडून बारामतीची लढाई सोपी करण्याचा प्रयत्न केला. मंत्री उदय सामंत इथे आपल्या बंधूंचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ पक्का करत होते. तिथे नारायण राणेंना मैदानात उतरवण्याचे भाजपने ठरवले आहे.

Advertisement

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.