For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धक्कादायक! अभिनेता यशच्या वाढदिवसाचे कटआऊट लावताना तीन युवकांचा शॉक लागून मृत्यू

06:09 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
धक्कादायक  अभिनेता यशच्या वाढदिवसाचे कटआऊट लावताना तीन युवकांचा शॉक लागून मृत्यू
actor Yash birthday
Advertisement

 : गदग जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कन्नड सिनेअभिनेता यश याच्या वाढदिवसानिमित्त भलामोठा कटआऊट्स लावताना विद्युततारेचा स्पर्श झाल्याने तीन चाहत्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गदग जिल्ह्याच्या लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरणगी येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. तीन युवकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. राज्य सरकारने मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. चाहत्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच अभिनेता यश याने सोमवारी दुपारी गदगला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Advertisement

रविवारी रॉकींग स्टार यश याचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी चालविली होती. शनिवारी रात्री लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरणगी येथे अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी 30 फूट उंचीचा कट्आऊट उभा करण्याची योजना आखली. मात्र, नियतीचा खेळच वेगळा होता. उत्साहाच्या भरात कटआऊट उभा करत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हनुमंत हरिजन (वय 21), मुरळी नडुविनमनी (वय 20), नवीन गाजी (वय 19) या युवकांचा मृत्यू झाला. तर मंजुनाथ हरिजन, दीपक हरिजन आणि प्रकाश मॅगेरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मृत तिन्ही युवकांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच शिरहट्टीचे आमदार चंद्रू लमाणी यांनी लक्ष्मेश्वर इस्पितळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करून घटनेविषयी शोक व्यक्त केला. सुरणगी येथे फ्लेक्स लावताना शॉक लागून तीन युवकांचा मृत्यू झाल्याचे समजताच दु:ख झाले. मृतांच्या आत्म्याला सद्गती लाभो. मृत युवकांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश दिला आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. जखमींच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आमदार चंद्रू लमाणी यांनी मृत युवकांच्या कुटुंबाना प्रत्येकी 25 हजाराची मदत जाहीर केली.

Advertisement
Tags :

.