For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धक्कादायक! शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त!

12:04 PM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
धक्कादायक  शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त
Advertisement

पोलीस आयुक्तांचीच कबुली, गुन्हेगारी रोखणार तरी कशी?

Advertisement

बेळगाव : गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस दलाला मदतीचे ठरावे, यासाठी शहर व उपनगरात वेगवेगळ्या योजनेतून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 180 कॅमेरे बंद आहेत. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर व उपनगरात 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी 110 कॅमेरे सुस्थितीत असून 170 कॅमेरे बंद आहेत, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.

पोलीस दलाच्यावतीने बसविण्यात आलेल्या 60 पैकी 50 कॅमेरे कार्यरत आहेत. 10 बंद असून त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. नादुरुस्त कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसाठी स्मार्ट सिटी विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. कारण 280 कॅमेऱ्यांची देखभालही स्मार्ट सिटीकडूनच केली जाते. या कॅमेऱ्यांचे कमांड सेंटरही त्यांच्याच अखत्यारीत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागाला दुरुस्तीसाठी पत्र पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Advertisement

बेळगाव शहर व उपनगरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्या रोखण्यात पोलीस दलाला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधून पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना धारेवर धरले. आता आम्ही बंदोबस्तातून बाहेर पडलो आहोत. सध्या कोणता मोठा बंदोबस्त नाही. त्यामुळे आमचे संपूर्ण लक्ष आता गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासावर आहे. मार्केट, एपीएमसी व मारिहाळ पोलिसांनी आठ चोरी प्रकरणांचा छडा लावला आहे. चौघा जणांना अटक करून 9 लाख 30 हजार रुपये किमतीचे 133 ग्रॅम सोने, 50 हजार रुपये किमतीची 458 ग्रॅम चांदी, तीन मोटारसायकली व एक पाणीपुरीची गाडी जप्त केली आहे.

गांजा व इतर अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जात आहे. एका संशयिताला अटक करून 509 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. टिळकवाडीत हेरॉईनही जप्त करण्यात आले आहे. हा साठा गोव्याहून येतो, अशी माहिती मिळाली आहे. लवकरच त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी धडपड सुरू आहे. वेश्या व्यवसाय प्रकरणी एका लॉज चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या काळ्या यादीतील चौघा जणांवर कारवाई करून त्यांनी दिलेले बाँड गोठवण्यात आले आहेत, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी उपायुक्त रोहन जगदीश उपस्थित होते.

गैरधंद्यांना पोलिसांचाच वरदहस्त आहे का?

मटका व जुगार खुलेआम सुरू आहे. काही पोलीस अधिकारी व्यवसाय चालकांशी हातमिळवणी करून आहेत. एका अधिकाऱ्याने तर मटका अड्डा चालकाकडून आयफोन घेतला आहे. या गैरधंद्यांना पोलिसांचाच वरदहस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत पत्रकारांनी पोलीस आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली. याविषयी चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी रात्रीची गस्त, ऑटोरिक्षाचालकांची मनमानी, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा आदी विषयांकडेही पत्रकारांनी पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले.

Advertisement
Tags :

.