कंत्राटी कर्मचाऱ्याला बीएलओ म्हणून नेमल्याची धक्कादायक माहिती
प्रतिनिधी / तिसवाडी
पणजीतील 28 पैकी 30 बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) बदलण्याच्या आदेशाला उपजिल्हाधिकाऱ्याने स्थगिती दिली असली तरी हा आदेश रद्द होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला असताना नवीन बीएलओ यादीत कंत्राटी कर्मचाऱ्याला नेमल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मदरसा मकंदर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सोसायटीत पंपचालक पदावर कंत्राटावर आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशात नमूद केली आहे.
कृषी भवन, विभाग क्रमांक 29 येथे मकंदर याची नेमणूक झाली होती, असे यादीत माहिती दिली आहे. कंत्राटी पद्धतीवर असलेले बीएलओ झाल्यास त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवले जाऊ शकते. तसेच कंत्राटी नोकरी असल्याने बांधीलकी नसल्याने काम नि:पक्षपातीपणे होणार याची खात्री नसते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याची नेमणूक कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बीएलओ काम हे जबाबदारीचे असल्याने मतदार यादी तयार करताना प्रशिक्षण असणे आवश्यक असते. त्याशिवाय एमटीएस, एलडीसी पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी दिली जाते. परंतु एका पंपचालकाला ही जबाबदारी देणे कितपत योग्य आहे. त्यात पणजी महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यात आणि विधानसभा निवडणूक दीड वर्षांत होणार असल्याने या काळात नवीन बीएलओंना ही जबाबदारी झेपणार की नाही, असे प्रश्न निर्माण होणार आहेत.
काँग्रेस नेते एल्विस गोम्स तसेच उत्पल पर्रीकर यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर गोम्स यांनी भारतीय निवडणूक आयोगात तक्रार केल्यानंतर अखेर बीएलओ आदेशाला तूर्तास स्थगिती दिली आहे.