सोलापुरात धक्कादायक घटना : वृद्ध वडिलांच्या देखभालीस कंटाळून मुलाने केला जन्मदात्याचा खून
सोलापुरात कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना
सोलापूर : वृद्ध वडिलांची देखभाल, खाणे-पिणे व दैनंदिन सेवेला कंटाळून मुलाने जन्मदात्याचा निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सोलापुरातील न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, जुना विडी घरकुल परिसरात घडली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांवर हल्ला करणाऱ्या या मुलाला अटक करण्यात आली आहे.न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती येथे राहणारे नंदकुमार गायकवाड यांची त्यांच्याच मुलगा मनोज नंदकुमार गायकवाड याने हत्या केली.
या प्रकरणी आई अरुणा नंदकुमार गायकवाड यांनी मुलाविरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी मनोज हा वडील नंदकुमार यांची खाणे-पिणे, . संडास बाथरूम तसेच रोजच्या देखभालीस कंटाळला होता. याच कारणावरून सायंकाळी स्वयंपाकाच्या मुद्यावरून वडील-मुलामध्ये जोरदार भांडण झाले.
या भांडणातून संतप्त झालेल्या मनोज याने घरात असलेला लोखंडी पाईप उचलून नंदकुमार यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच गुप्तांगावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात नंदकुमार गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.