For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुदरगड तालुक्यात धक्कादायक प्रकार; खानापूरमध्ये ३० जणांचा थरारक हल्ला; जेसीबीने घर उद्ध्वस्त

01:29 PM Feb 15, 2026 IST | NEETA POTDAR
भुदरगड तालुक्यात धक्कादायक प्रकार  खानापूरमध्ये ३० जणांचा थरारक हल्ला  जेसीबीने घर उद्ध्वस्त
Advertisement

                                                     गारगोटी परिसरात दहशत

Advertisement

गारगोटी :  खानापूर (ता. भुदरगड) येथे थरारक प्रकार घडला असून श्रीमती सरस्वती नामदेव चव्हाण यांच्या घरावर २५ ते ३० जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तेरा तोळे सोने, नऊ लाखांची रोकड व जमीन वाटणीपत्राचे स्टॅम्प लंपास करत जेसीबीच्या साहाय्याने घर व संसारोपयोगी साहित्य उद्ध्वस्त करून जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तब्बल ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद दिली आहे.

गुरूवारी (ता. ११) सकाळी ८. ३० वा. सुमारास श्रीमती चव्हाण व मुलगा राजेंद्र घरी असताना गारगोटी सोनाळी येथील बजरंग पांडुरंग देसाई व पृथ्वीराज दिनेश घाटगे यांनी घरात घुसून लोखंडी राॅडने जबरी मारहाण करून जखमी केले. राजेंद्र याच्या गळ्यातील चेन हिसकावली. जखमींना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले असताना दुपारच्या सुमारास खानापूर येथील गट नं. ३३२ मधील राहते घर पृथ्वीराज घाडगे, संजय अमृत देसाई व इतर २५ ते ३० लोकांनी दहशत करून जेसीबीने घर व संसारोपयोगी साहित्य उध्वस्त केले. घरातील जमीनीचे वाटणी पेपरचे स्टॅम्प, पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, तिन तोळ्याची चेन, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट, तिन तोळ्याच्या अंगठ्या, नऊ लाखांची रोकड असे सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद श्रीमती सरस्वती चव्हाण यांनी पोलिसात दिली. पोलीसांनी याप्रकरणी बजरंग पांडुरंग देसाई, पृथ्वीराज दिनेश घाडगे, संजय अमृत देसाई (रा. सोनाळी) या तिंघासह सुमारे २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलिस उपविभागीय रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास गोरख चौधर करीत आहेत. या प्रकरणामुळे खानापूर परिसरात दहशदीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.