अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर राधानगरी तालुक्यातील चौघांकडून अत्याचार, आरोपींमध्ये प्राध्यापिकेचा मुलगा
मुरगुड / वार्ताहर
महाविद्यालयीन ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीला अश्लिल फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामध्ये राधानगरी तालुक्यातील आदित्य बाजीराव शेटके वय २४ वर्षे (खिंडी व्हरवडे), रणजित संभाजी मुधोळकर वय २९ वर्षे (रा. सोळांकुर), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर वय २४ वर्षे (रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील वय २२ वर्षे (रा. बुजवडे) या चौघा आरोपींना मुरगुड पोलिसांनी वेगाने हालचाली करत रात्री उशिरा अटक केली. सुरुवातीला गुन्हा मुरगुडात घडल्यामुळे या प्रकरणी मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित तरुणी पदवीच्या द्वितीय वर्षात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सेमिस्टरचे ओळखपत्र तयार करण्यासाठी तीने आदित्य बाजीराव शेटके (रा. बिद्री कापडे, ता. राधानगरी) याच्या मोबाईलवर आपला फोटो पाठवला. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिठा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगुडमध्ये ओळखपत्र आहे असे सांगत मुरगुडमधील तलाव परिसरामध्ये गाडीमध्ये नेले. तिथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवत त्याने गिरगाव ता. करवीर येथील एका लॉजवर नेऊन तिथे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून तिच्यावर अत्याचार केला.
अनेकांकडून अत्याचार
त्यानंतर आरोपी आदित्यने त्या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. रणजितने त्या तरुणीला सीबीएस कोल्हापूर येथील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानेही तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर आरोपींनी त्या तरुणीची ओळख प्रज्वलगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्याने तरुणीला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन कागलमध्ये येथील एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला.
तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडून ओळख वाढवून दिली. त्यानेही पाचगाव येथील अशोकराज लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक लॉजवर नेऊन अत्याचार
पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुरगुड येथील तलाव परिसर, निपाणी, कागल, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉज, अशोकराज लॉज व टॉप हिल लॉज येथे वेळोवेळी पीडितेवर आरोपींनी अत्याचार केले. याउपर प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींनी पैशांच्या मागणीचाही तगादा लावला. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देऊन पीडितेचा मानसिक छळ करण्यात येऊ लागला. गेल्या सहा - सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती फिर्यादीमध्ये नोंद केली असून त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने सोमवारी दि.१ रोजी मुरगुड पोलिस ठाण्यात येऊन सहाय्यक पोलिस निरिक्षक क्रांती पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली.
या फिर्यादीवरून मुरगुड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत. दरम्यान, चौघाही आरोपींना कागलच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता सर्व आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.
‘बडे घर की बिगडी औलाद’
या प्रकरणातील प्रज्वलगिरी पालकर हा उच्च विद्या विभूषित आणि राधानगरी रक्षक समिती प्रमुख प्रा. ऐश्वर्या पालकर यांचा मुलगा असून पालकरांच्या दिवट्याने केलेल्या विकृत कृत्याबद्दल ‘बडे घर की बिगडी औलाद’ अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे, तर काही आरोपी राजकीय हितसंबंध असणाऱ्या नेत्यांच्या ‘कार्यकर्त्यांची बिघडलेली मुलं असल्यामुळे हे प्रकरण कसोशीने मिटवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात आहे.’
पोलीस अधीक्षक मुरगुडात !
या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी मुरगुड पोलीस ठाण्याला सकाळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली.
तपास सखोल झाला तर ...
यातील काही आरोपींनी अशाच प्रकारचे अनेक कारनामे केल्याची आत चर्चा सुरू आहे. पीडित तरुणी तक्रारीसाठी पुढे आल्या तर पोलिस तपासात अनेक प्रकरणे उघड होतील. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे अशा अनेक प्रकरणात या तरुणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.