Kolhapur News : कोल्हापूर कळंबा कारागृहात धक्कादायक हल्ला; आरोपीने कर्मचाऱ्यांवर मारहाण
मोक्का अंतर्गत आरोपीने कारागृह गोंधळात टाकला
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कोठडीत असलेल्या आरोपीने हल्ला करून मारहाण केली. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कळंबा कारागृहाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स रुमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी इम्नान शमशुद्दीन शेख (वय ३९, रा. मध्यवर्ती कारागृह, कळंबा मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संभाजी बाबुराव कामले (वय २४), पोलीस शिपाई विलास उत्तम पारसे हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील इम्मान शेख याच्यावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. वर्षभरापूर्वी शेखची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी शेखची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीची तारीख होती. यासाठी सकाळी ११ च्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्स रुममध्ये नेण्यात आले.
सुनावणीसाठी जास्त नंबर असल्यामुळे संभाजी कामले यांनी शेखला जाळीमध्ये बसण्यास सांगितले. यावेळी शेखने कामले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कॉलरला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. कामले यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या तोंडावर ठोसा मारला. यावेळी पोलीस शिपाई विलास पारसे हे शेख याला पकडण्यासाठी गेले असता, शेखने पारसे यांच्या उजव्या पायाचा चावा घेतला. या गोंधळामुळे कारागृहातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेखला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बॅराकमध्ये केली. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटोळे करत आहेत.