धक्कादायक: सांगलीत दहावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा धुमाकूळ; उत्तरे न दाखवल्याने सहकाऱ्यावर रॉडने हल्ला
सांगलीत दहावी परीक्षा केंद्रावर हिंसाचाराची गंभीर घटना
सांगली - दहावी परीक्षेच्या पेपरची उत्तरे पहायला दिली नाहीत म्हणून परिक्षा केंद्रातच एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांवर चार ते पाच विद्यार्थ्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये सदर विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुध्दावस्थेत गेला आहे. त्याच्यावर सांगली येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही पोलीस मौन बाळगून आहेत.तर ज्या खासगी शिक्षणसंस्थेत ही घटना घडली, तेथील मुख्याध्यापक, व अन्य शिक्षक या प्रकरणावर पडदा पाडण्याच्या तयारीत असून पालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांसमोरचहा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या माध्यमिक शालांत परीक्षा विभागामार्फत दहावीची परीक्षा सुरू आहे. जत शहरातील एका खासगी संस्थेच्या शाळेत या परीक्षेचे केंद्र आहे. सोमवारी दुपारी पेपर सुरू होता. यावेळी एका विद्यार्थ्यांच्या पाठिमागे बसलेल्या विद्यार्थ्याने पेपरमधील उत्तरे दाखवण्यास सांगितले. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्यांने त्यास नकार दिला. त्यामुळे पाठिमागे बसणाऱ्या विद्यार्थ्याला राग आला.
परीक्षा संपताच संबंधीत विद्याध्यनि मला पेपरमधील उत्तरे का दाखवलीस नाहीस, असे म्हणत त्या विद्यार्थ्याशी वाद घातला. शाळेच्या आवारात भर परीक्षा केंद्रावरच शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने लोखंडी रॉड आणला. आणि त्याने संबंधीत विद्यार्थ्यावर जोराचा हल्ला चढविला.लोखंडी रॉडने विद्यार्थ्याच्या डोक्यात जोराने वार करण्यात आला. यामध्ये सदर विद्यार्थी रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसाने आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीचालकाने त्यास तात्काळ जत येथील रूग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर इजा झाल्याने त्याला मिरजेत हलविण्यात आले. वाटेमध्ये सदर जखमी विद्यार्थ्याने रक्ताच्या उलट्याही केल्या.
डोक्याला गंभीर इजा झाल्याने जखमी विद्यार्थ्याला सांगली-मिरज रस्त्यावरील मेंदूविकार तज्ज्ञाकडे नेण्यात आले. तेथे त्याला बेशुध्दावस्थेत दाखल करण्यात आले. सदर जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून तो सध्या कोमात आहे.
भर दिवसा पोलीस ठाण्यापासून जवळचअसलेल्या परीक्षा केंद्रावर ही गंभीर घटना घडूनही पोलीस आणि शिक्षकांना त्याचे गांभिर्य कळाले नाही. सदर शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनाही या घटनेचे गांभिर्य समजले नाही.मंगळवारी सकाळी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मागणीनंतर शाळेतील अन्य मुलांचे जबाब घेण्यात आल्याचे समजते. आपल्याच शाळेतील मुलगा जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना संस्थाचालक, शिक्षक आणि संशयितांचे पालक सदर प्रकरण मिटविण्यासाठी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांबर आणि नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.