मसुरेत उबाठा शिवसेनेला धक्का
उबाठाचे पंढरीनाथ मसुरकर आणि मनीष बागवे शिंदे शिवसेनेत
मसुरे प्रतिनिधी
उबाठा शिवसेनेला मसुरेत खिंडार पडले असून वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक असलेले भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर आणि प्रसिद्ध भजनी बुवा मनीष बागवे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि विधानसभेचे उमेदवार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून नुकताच मसुरे येथे शिवसेनेत प्रवेश केला . दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरीनाथ मसुरकर आणि मनीष बागवे यांचे शिवसेनेमध्ये दत्ता सामंत यांनी स्वागत करून शिवसेनेमध्ये तुमचा योग्य तो मानसन्मान यापुढेही राखला जाईल असे अभिवचन दिले.यावेळी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दत्ता सामंत ,उमेदवार निलेश राणे हे कार्यकर्त्यांना संभाळणारे आणि त्यांच्या सुखदुःखात नेहमी सामील होणारे नेते असून भविष्यात आमदार म्हणून या मतदारसंघाला निलेश राणे यांचीच जरुरी असल्याने यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे पंढरीनाथ मसुरकर आणि मनीष बागवे यांनी प्रवेश करताना सांगितले. पंढरीनाथ मसुरकर हे मसुरे येथील भंडारी समाजसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रात मसुरे परिसरामध्ये त्यांचा मोठा नावलौकिक आहे. अनेक कुटुंबांच्या विविध प्रसंगांमध्ये पंढरीनाथ मसुरकर नेहमी धावून जात असल्यामुळे त्यांचा सर्वांशी जनसंपर्क दांडगा आहे.
तसेच मनीष बागवे हे डबलबारी भजन क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून मसुरेच्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचेही मोठे वजन असून या दोघांच्या शिवसेना प्रवेशाने उबाठा शिवसेनेला परिणामी आमदार वैभव नाईक यांना मसुरेत धक्का बसला आहे. यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले सुमारे 50 हजारांचं मताधिक्य घेऊन निलेश राणे हे विजयी होणार असून वैभव नाईक यांना यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. येथील सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे हेच योग्य उमेदवार असून गेली दहा वर्ष वैभव नाईक यांनी हा मतदार संघ विकासाच्या बाबतीत मागे नेऊन ठेवला आहे. येथील कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात कधीही वैभव नाईक सहभागी झाला नाही किंवा विकासात्मक एकही ठोस काम मालवण- कुडाळ मतदार संघात मागील दहा वर्षात आमदाराकडून झाले नसल्याने येथील जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. येथील सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांना विजयी करणारच असा ठाम विश्वास यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. तसेच प्रवेशकर्त्या सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत करून या सर्वांचा योग्य तो मानसन्मान शिवसेना पक्षामध्ये नेहमीच राखला जाणार आहे. यावेळी माजी जि . प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, पुरुषोत्तम शिंगरे,माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, सतीश मसुरकर ,शिवाजी परब, सचिन पाटकर,अजय प्रभुगावकर, श्री राणे आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.