For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक पदकविजेतीला मालविका बनसोडचा धक्का

06:38 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक पदकविजेतीला मालविका बनसोडचा धक्का
Advertisement

वृत्तसंस्था/ चांगझाऊ, चीन

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगवर भारताच्या मालविका बनसोडने सनसनाटी विजय मिळवून पहिल्याच फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आणले. चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत तिने हा विजय नोंदवत महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.

22 वर्षीय मालविका जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानावर आहे. तिने या सामन्यात जिगरबाज खेळ करीत पहिल्या गेममध्ये तीन गेमपॉईंट्स वाचवत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या तुनजुंगला 26-24, 21-19 असा 46 मिनिटांच्या खेळात पराभवाचा धक्का दिला. कारकिर्दीतील आजवरचा तिचा हा सर्वात मोठा विजय आहे. कम्प्युटर सायन्समध्ये बी टेक केलेल्या मालविकाची पुढील लढत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मूरशी होईल. गिल्मूरने दोनदा राष्ट्रकुल पदक मिळविले आहे.

Advertisement

अन्य सामन्यात भारताच्या आकर्षी कश्यप व सामिया इमाद यांना पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. आकर्षीला चिनी तैपेईच्या चियु पिन चियानकडून 15-21, 19-21 असा तर सामियाला गिल्मूरकडून 9-21, 7-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही पराभव स्वीकारावा लागला. त्यांना चिनी तैपेईच्या हसीह पेइ शान व हुगं एन-त्झू यांनी 21-16, 15-21, 17-21 असे हरवित आगेकूच केली. मिश्र दुहेरीत बी. सुमीत रेड्डी-एन.सिक्की रेड्डी यांना मलेशियाच्या टॅन कियान मेंग व लाय पेइ जिंग यांनी 21-10, 21-16 असे हरविले.

Advertisement
Tags :

.