For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Mahayuti News | अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महाविकास आघाडीला धक्का, सोलापुरात नेमकं काय घडलं?

11:42 AM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur mahayuti news   अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महाविकास आघाडीला धक्का  सोलापुरात नेमकं काय घडलं
Advertisement

भाजपकडे निवडणुकीत स्पष्ट संख्याबळ

Advertisement

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार तथा बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच महाविकास आघाडीला राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली.

शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील हे अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

Advertisement

भाजपकडे या निवडणुकीत स्पष्ट संख्याबळ असल्याने पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला, तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तसेच भाजप उमेदवाराला अधिकाधिक पाठिंबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. अर्ज दाखल कार्यक्रमात महायुतीबरोबरच विविध पक्षांतील लोकप्रतिनिधींची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, नारायण पाटील, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, राम सातपुते, शहाजी पाटील, संजय शिंदे, दीपक साळुंखे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यामुळे अर्ज दाखल कार्यक्रमाचे रूपांतर शक्तिप्रदर्शनात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपकडे सुमारे ३०७ मतांचे संख्याबळ असल्याचे बोलले जात असल्याने पक्षाचा विजय सुकर मानला जात आहे.

मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे महाविकास आघाडीतील किती मतदार आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीतील घटक पक्षांचे एकत्रित मतदान, विरोधकांची रणनीती आणि भाजपमधील अंतर्गत नाराजी यांचाही निकालावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्यामुळे विजयाचे गणित भाजपच्या बाजूने असले तरी निवडणुकीतील पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. फत्तेपूरकर यांनी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

Advertisement
Tags :

.