शाहिराने होयबा नव्हे शिवबा असले पाहिजे! शिवशाहीर राऊत यांचं जागतिककरण, ऑनलाईनच्या जमान्यात पोवाडा प्रबोधन
जनजागृतीचे प्रभावी माध्यम : तरुण भारत संवादला विशेष मुलाखत
कोल्हापूर/ संजीव खाडे
शिवकाळापासून पोवाड्याच्या माध्यमातून शाहिरांनी प्रबोधन, जनजागृतीचे काम केले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातही शाहिरांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. कोणत्याही प्रश्न, समस्याविषयी लोकजागृतीचे कार्य शाहीर आपल्या पहाडी आवाज, डफाच्या माध्यमातून करू शकतो. आज जग बदलत असताना वेगवेगळ्या प्रश्नांना, अडचणींना सामोरे जात असताना शाहिरांची भूमिका ही प्रबोधनवादी असली पाहिजे. पोवाड्यातून व्यवस्थेला, सत्तेला सवाल विचारणारी असली पाहिजे. शाहिराने आजच्या जमान्यात होयबा ऐवजी शिवबा होत जर पोवाडा सादर केला तर तो आणखीन प्रभावी माध्यम ठरेल, असे मत शिवशाहीर डॉ. पुरूषोत्तम उर्फ राजू राऊत यांनी व्यक्त केले.
डॉ. राजू राऊत यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या निमित्ताने त्यांनी तरुण भारत संवादला दिलेल्या मुलाखतीत आपली मते बेधडकपणे मांडली. त्यांच्याशी झालेला संवाद.
प्रश्न : आपण शाहिरीकडे कसे वळला?, घरी परंपरा होती?
डॉ. राऊत : मी ज्या शिवाजी पेठेत जन्मलो तिथे कलेची, शाहिरीची परंपरा आहे. माझे वडील कृष्णा दादाबो तथा कृ. दा. राऊत चळवळी चित्रकार होते. शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक माझ्या वडिलांचे मामा. सरनाईकांचा रणभेदीची शाहिरीचा आमच्या लहानपणापासून प्रभाव होता. लहरी हैदरना आम्ही पाहिले नाही. पण त्यांच्या वारसा, परंपरेने आम्हाला प्रभावित केले. शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकात, बावडेकर आखाड्यात पूर्वी लोककलेचे नानाविध प्रकार कलाकार, कलामंडळी सादर करत असत. ना. ब. निकम, श्रीपतराव लोखंडे या शाहिरांचे पोवाडे पाहून पोवाड्याकडे लहानपणापासून ओढा वाढू लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर वामनराव कर्डक, शाहीर अमर शेख यांच्यापासून प्रेरणा लाभली.
प्रश्न : प्रत्यक्षात पोवाडा सादर करण्यास केव्हा सुरूवात केली?
डॉ. राऊत : शालेय जीवनात महाराष्ट्र हायस्कूलमध्ये असताना गॅदरिंगमध्ये (स्नेहसंमेलन) मित्रांच्या सहकार्यांने पोवाडा गायला. पाचवी ते दहावी पोवाडे सादर केले. पण त्यानंतर गॅप पडला. एकोणीस वर्षे शाहिरीपासून दूर होतो. वयाच्या पस्तशीनंतर 1997 मध्ये पुन्हा डफ, तुणतुणे हाती घेतले. :त्याला कारणही बहुजन समाज पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम आणि उत्तर प्रदेशच्या तत्कालिन मुख्यमंत्री मायावती. या दोघांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये राजर्षी शाहू महराजांच्या जयंतीनिमित्त शाहू मेला (शाहू महोत्सव) आयोजित केला होता. त्यावेळी 27 जणांचे पोवाडा पथक घेऊत सहभागी झालो. तेथे सात लाख लोकांची उपस्थिती होती. दुर्दैवाने कार्यकम सादर करण्याची संधी मिळाली नाही, पण निराश न होता ठरविले की बस्स आता यापुढे शाहीरी पुन्हा सुरू करायची आणि त्यानंतर शाहिरीची प्रवास पुन्हा सुरू झाला.
प्रश्न : शाहीर नेमके कुणाला म्हणायचे?, शाहिराची व्याख्या काय?
डॉ. राऊत : कानपूरला आम्हाला पोवाडा सादर करण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी मानहानी सहन करावी लागली. हा कुठला शाहीर?, या कुठे पोवाडा म्हणायला येतो?, अशी टिका, टिप्पणी झाल्यानंतर ठरविले आता पोवाडा आणि शाहीरी काय ते संपूर्ण जगापुढे आणायचे. मग अभ्यास सुरू केला, सहकाऱ्यांना एकत्रित घेऊत पथक सुरू केले. स्पर्धा घेऊ लागलो, सलग सात स्पर्धात पहिला क्रमांक मिळवला. कधीही दुसरा क्रमांक आला नाही. अकरा राज्ये फिरलो, दांडीयात्रेत फिरलो. पोवाडा म्हणणारा शाहीर नसतो, तर जो पोवाडा लिहितो, म्हणजे कवन बांधतो आणि ते गाऊन सादर करतो, विविध विषय शब्दरूपातून हाताळत त्याला शाहीराचा आवाज देतो, तो शाहीर. आजवर मी विविध विषयावर अडीच हजारहून अधिक पाने पोवाड्यासाठी विविध छंदात लिहिली आहेत.
प्रश्न : पोवाडे नेहमी शौर्याचे वर्णन करणारे असतात आपण कोणत्या प्रकारचे पोवाडे लिहिले आहेत?
डॉ. राऊत : मी कधी व्यक्तीपूजा करण्यासाठी पोवाडे लिहिले नाही. इतिहास पुरूषांवर पोवाडे लिहिले. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी यांच्यासह छत्रपती चिमासाहेब महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शहीद भगतसिंह यांच्यासह महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सिमाप्रश्नावर पोवाडा लिहिला. अध्यात्मावरही पोवाडा लिहून सादर केला.
प्रश्न : आजच्या जमान्यात पोवाड्याचे, शाहिराचे महत्व आणि जबाबदारी विषयी काय सांगाल?
डॉ. राऊत : काळ बदलत आहे. प्रश्न, समस्याचे स्वरूपही बदलत आहे. अशावेळी इतर माध्यमांप्रमाणे शाहीरीकलेची, शाहिराची आणि त्याच्या पोवाड्याचीही जबाबदारी वाढली आहे. पूर्वीप्रमाणे पोवाड्यातून जनजागृती, प्रबोधन, एखाद्या प्रश्नावर आवाज उठविता येतो. धारदार शब्दाला जर पहाडी आवाजाची साथ असेल तर प्रश्न घेऊन व्यवस्थेशी भिडता येते. आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून हागणदारीमुक्त गाव, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव या अभियानांसह स्त्राrभ्रूण हत्या, रंकाळा प्रदूषण, पंचगंगा प्रदूषण, शहरातील ख•s आणि रस्ते, व्यसनमुक्ती, टोलविरोधी आंदोलन आदींवर भाष्य करणारे पोवाडे लिहून प्रबोधन, जागृतीच्या चळवळीत योगदान दिले. आजही त्याची गरज आहे. फक्त शाहिराने सत्तेच्या बाजूने होयबा न राहता, भाटगिरी न करता व्यवस्थेला, सत्तेला प्रश्न, जाब विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे. त्यासाठी होयबा नव्हे तर शिवबा होण्याची गरज आहे. मनोरंजन, करमणूक हे अंतिम उद्दीष्ट न ठेवता लोकप्रबोधनवादी व्हावे, तरच ही कलाही टिकून राहिल.
अष्टपैलू व्यक्तीमत्व
शिवशाहीर डॉ. पुरूषोत्तम ऊर्फ राजू राऊत केवळ शाहीर नाहीत तर ते चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, छायाचित्रकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, लघुपट दिग्दर्शक, निर्माते आहेत, सामाजिक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, मार्गदर्शक आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला पोवाड्याच्या, शाहिरीच्या माध्यमातून सर्वदूर नेणारे शाहीर आहेत. आजवर त्यांचे दीडहजारहून अधिक शाहीरीचे जनजागृती करणारे कार्यक्रम झाले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना लोककलेतील पहिली ऑनररी डॉक्टरे पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्यांना विविध पुरस्कारही लाभले आहेत.
रायगडवर चौदा वर्षे शिवराज्याभिषेकाला शाहिरी सेवा समर्पित
डॉ. राजू राऊत गेली चौदा वर्षे शिवतीर्थ दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थित राहून शाहीरी सेवा युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत असतात.
शिवपसायदान, भुपाळी
डॉ. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवपसायदान लिहिले आहे. शिवरायांवर भुपाळी लिहिली आहे. शिवरायांवर बालाजी नमस्कार अष्टकची निर्मिती केली. श्रीसुक्ताचे मराठीत भाषांतर केले. प्रयोगशीलता त्यांचा स्थायीभाव आहे.
समाजाचा तोल सुटतो, तेव्हा शाहिराचा काळ लागलेला असतो. शाहिराने शाहिरीचे पावित्र्य जपत प्रबोधनाचे कार्य केले पाहिजे. त्यासाठी अष्टावधानी असले पाहिजे.
-डॉ. पुरूषोत्तम उर्फ राजू राऊत, शिवशाहीर, कोल्हापूर