"अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही" शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या टीकेला नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचे उत्तर
कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत केलेल्या गंभीर आरोपांना आता नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर देत आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही असे म्हटले आहे. यानिमित्ताने पुर्वाश्रमीच्या एकसंध शिवसेना नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
रविकिरण इंगवलेंचे आरोप काय आहेत?
गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रविकिरण इंगवले यांनी आ. राजेश क्षीरसागर यांचे पुत्र नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. ऋतुराज क्षीरसागर यांचा गोव्यातील एका कसीनोतील व्हिडिओ दाखवत करत इंगवले यांनी क्षीरसागर यांचे कुटुंब कधीही सुसंस्कृत नव्हते, लोकांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारणारा, जुगार खेळणारा क्षीरसागर यांचा मुलगा असल्याचे म्हटले.
तुमच्याकडून इतरांनी काय शिकायचे? तुमच्या सोबत असणारी मुलंही त्याच वळणावर जाणार असा टोला यावेळी इंगवले यांनी ऋतुराज क्षीरसागर यांना लगावला आहे.
तर विधानसभेत राजेश क्षीरसागर यांचा पराभव झाला असता
पत्रकार परिषदेत बोलताना इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना जर इव्हीएम नसते तर क्षीरसागर यांचा पराभव झाला असता असे म्हटले. यावेळी इंगवले यांनी जयप्रभा स्टुडिओचं काय झालं असाही सवाल केला.
ऋतुराज क्षीरसागर यांचा पलटवार
रविकिरण इंगवले सातत्याने क्षीरसागर कुटुंबीयांना बदनाम करण्याचं काम करत आहेत..त्यामुळे त्यांच्या या आरोपाला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय.शिवाय जनता ठरवत असते काय करायचं , ही लोकं कोण ठरवणार?सातत्याने क्षीरसागर कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नसल्याचा पलटवार ऋतुराज क्षीरसागर यांनी केलाय.