Kolhapur : खराब रस्त्यांविरोधात शिवसेनेचा महापालिकेवर ‘हल्लाबोल’
शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; रस्ते पाहणीसाठी अधिकाऱ्यांना घेरावो, मुदतीमध्ये रस्ते खराब केलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टसाठी आक्रमक
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील खराब झालेल्या रस्त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने मंगळवारी महापालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. शहर खड्डेमुक्त करण्यात अपयशी ठरल्यावरून अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी राजीनामा द्यावा. मुदतीमध्ये खराब रस्ते झालेल्या 6 ठेकेदारांना तत्काळ ब्लकलिस्ट करावे, अशी मागणी केली. शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करावी यासाठी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
शिवसेना ठाकरे गट खराब रस्त्यावरून आक्रमक झाले त्यांनी मंगळवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. ‘चला चला दिवाळी आली....खड्डा दुरुस्तीची वेळ झाली' 'रस्ते आमच्या हक्काचे....नाही कुणाच्या बापाचे' 'हल्लाबोल हल्लाबोल...जनतेसाठी हल्लाबोल’ अशा घोषणा देत महापालिका परिसर दणाणून सोडला. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, महापालिका कायदानुसार चालते की कोणाच्या इशाऱ्यावर. काम जमत नसेल तर शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्तांनी राजीनामा द्यावा. शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार ही बाब निदर्शनास आणूनही कार्यवाही झालेली नाही. अधिकाऱ्यानी चार चाकीतून फिरण्यापेक्षा दुचाकीवरुन शहरातून प्रवास केल्यास त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील,अशा शब्दात महापालिकेच्या कामकाजाचा समाचार घेतला.
महेश उत्तुरे यांनी वॉरंटीमध्ये खराब झालेल्या रस्त्यांच्या 6 ठेकेदारांना ब्लकलिस्ट करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांसोबत बुधवारी सकाळी 10.30 वाजता रस्त्यांची पाहणी करण्याचे ठरले. यावेळी माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, विशाल देवकुळे, राजू जाधव, राजू यादव, अनिल पाटील, मंजित माने, शुभांगी पोवार आदी, उपस्थित होते.