शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची चुप्पी! शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता
शांतिनाथ पाटील- घुणकी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागात ऊसदर आंदोलन पेटले असून साखर कारखाना व्यवस्थापन व शेतकरी संघटना यांच्यामध्ये रस्त्यावरची लढाई सुरु आहे. मात्र नेहमी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या संघटनांबरोबर असनारा ग्रामिण शिवसेनेचा आवाज मात्र गायब झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी आक्रमक होणारी शिवसेना निवडणूकपूर्व हंगामात शांत का ? असा सवाल सामान्य शिवसैनिकाला पडला आहे.
कोल्हापूर सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरप्रश्नी सुरवातीपासूनच आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आपली भुमिका मांडली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसाला दराच्या मागणीसाठी शिवसेनेने ग्रामिण भागात मोठे आंदोलन उभा केले. मात्र गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेत पडलेली फूट तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सहकारीसंस्थांमधील प्रवेश यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाची धार बोथट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
मागील महिन्यातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी 'होऊ द्या चर्चा' अभियान गावोगावी राबविण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या घोषणांची जनते समोर पोलखोल करत जिल्हाप्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांनी लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार फिल्डिंगही लावली आहे.
पण ऊस उत्पादक व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या ऊसदर व गाय दुधदर कपात प्रश्नी मात्र शिवसेनेची हाताची घडी....तोंडावर बोट सर्वसामान्य शिवसैनिक व शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.
शिवसेनेने यापूर्वी ऊस दर आंदोलने केली. मात्र त्यांचे श्रेय घेण्यास कमी पडली. स्वाभिमानी पेक्षाही शिवसेनेने कितीतरी पटीने आक्रमक भुमिका घेवुन कारखानदाराना सळो की पळो करून सोडले. मात्र ऊस दराचा प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित बैठकीवेळी शिवसेनेला दुय्यम स्थान मिळत असे. तसेच आंदोलनाचे सर्व श्रेय माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वाट्याला गेल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांप्रश्नी आंदोलनातून काढता पाय घेतला.