अंबादास दानवे यांच्याकडून पोलीस अधीक्षकांची खरडपट्टी! क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कोण आहे हा राजेश क्षीरसागर? त्याच्या वर गुन्हा का दाखल केला नाही? इथे काय कुणाच्या बापाची जहागिरी आहे का? अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना खडसावले. कोल्हापूर दौ-यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनता दरबारात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार घेऊन आल्यावर त्यांनी अधीक्षकांशी फोनवरून याबाबत विचारणा केली.
पहा VIDEO >>> अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फोनवरून खडसावले...
शिवसेना नेते आणि राज्याचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूरात येऊन जनता दरबार घेतला. या दरबारामध्ये त्यांनी अनेक नागरीकांच्या समस्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसापुर्वी राज्य़ नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर शेजारी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप केला गेला होता. त्यासंदर्भातील व्हिडीयो व्हायरलही झाला होता. पण राजेश क्षीरसागर यांच्या राजकिय दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होता त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे डॉ. वरपे यांनी अंबादास दानवे यांची भेट घेतली होती.
यावेळी डॉ. वरपे य़ांनी दानवे यांना क्षीरसागर याच्यावर राजकिय दबावामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगितलं. त्यावर अंबादास दानवे यांनी थेट पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांना फोन लावला आणि खरडपट्टी काढली. ते म्हणाले, "राजेंद्र वरपे यांच्या तक्रारीनुसार राजेश क्षीरसागर यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही ? कोण हा राजेश क्षीरसागर ? बापाची जहागीर आहे का ? गुन्हा रजिस्टर का नाही ? त्यांना तुमच्यासमोर आता घेऊन येतो, कारवाई झाली पाहिजे, मस्ती चालणार नाही, पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले." अंबादास दानवे यांच्या या फोन कॉलची जिल्हाभरामध्ये चर्चा आहे.