शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन 15 पासून कोल्हापुरात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 17 रोजी सभा
महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा : राजेश क्षीरसागर यांची सूचना : तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यात शिवसेनेचे कोल्हापुरात झालेले सर्व कार्यक्रम शिवसैनिकांनी यशस्वी केले आहेत. त्याचमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन 15 ते 17 फेब्रुवारी कोल्हापुरात होणार आहे. 17 रोजी शिवसंवाद मेळाव्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी दिल्या.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात झाली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून सुमारे 20 हजार शिवसैनिक, कार्यकर्ते सभा स्थळी नेण्याची जबाबदारी स्वीकारली असून, ती पूर्ण करून दाखवूया, असे आवाहन केले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रीय अधिवेशन आणि शिवसंवाद मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या शिवसैनिकांवर सोपविल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे.
महाअधिवेशनामध्ये 15 फेब्रुवारी रोजी देशभरातील व राज्यातील शिवसेना नेते, मंत्री, प्रवत्ते, उपनेते, खासदार, आमदार यांच्यापासून तळागाळातील पदाधिकारी यांची नोंदणी केली जाणार आहे. 16 फेब्रुवारीला सकाळी व दुपारी आणि 17 फेब्रुवारीला सकाळी अशा तीन सत्रात महाअधिवेशन होणार आहे. यानंतर 17 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. गेल्या वर्षीच्या तपोवनवरील रेकॉर्डब्रेकिंग सभेप्रमाणे 17 रोजीची सभा तोडीस तोड असावी, त्यासाठी कामाला लागा, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी महानगरसमन्वयक शिवाजी जाधव,राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, निलेश हंकारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, मंगलताई साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, नम्रता भोसले, सुनील जाधव यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस कोल्हापुरात
शिवसेनेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात होत आहे. ते स्वत: तीन दिवस कोल्हापुरात तळ ठोकणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार असून, संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी याअनुषंगाने होणारी कार्यपद्धती अनुभवता आणि शिकता येणार आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.