MLA Kshirsagar Viral video "माझा तो व्हिडिओ AI जनरेटेड" टक्केवारीची चर्चा असलेल्या त्या व्हायरल व्हिडिओवर आ. क्षीरसागरांचा खुलासा
शिवसेना शिंदे पक्षाचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कंत्राटदाराशी टक्केवारीवर चर्चा करत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले.
हा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभरात खळबळ उडाली. अनेक राजकिय नेत्यांनी या मुद्द्यावर टीका करत सरकारच्या प्रतिनिधींनी भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. दरम्यान विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी क्षीरसागर यांना या व्हिडिओवर आपण पत्रकार परिषद घेत खुलासा करावा असे सुचवले. आज 28 जून रोजी क्षीरसागर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत झालेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.
हा एआय व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओवर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी हा व्हिडिओ डब असल्याचे सांगितले. रेवती सुळे यांच्या लग्नात दिवंगत अजित पवार यांचा एआय व्हिडिओ बनवला होता. तसाच प्रकार या व्हिडिओच्या बाबतीत झाला आहे असं क्षीरसागर म्हणाले. स्वत:च्या पदाचा राजीनामा देऊन वरिष्ठांचं मन जिंकण्यासाठी माझ्यावर आरोप करणाऱ्यांसाठी माझी पत्रकार परिषद नाही असं म्हणत राजेश क्षीरसागर यांनी नाव घेता रविकिरण इंगवले यांच्यावर टीका केली.
आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले"हा डब केलेला व्हिडिओ असून यात कुठल्याही शासकिय व्यवहाराचा काहीच संबंध नाही, उलट एका व्यक्तीला मी मदत करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचे पुरावे माझ्याकडे असून योग्यवेळी मी ते सादर करेन"
सतेज पाटील यांच्यावर टीका
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले सतेज पाटील यांना माझी काळजी वाटते पण मी त्यांनाही हे सांगतो की, त्यांचेही व्हिडिओ माझ्याकडे येत असतात पण मी सभ्य राजकारण करतो. जिल्ह्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे तुम्ही धक्क्यातून सावरला नाहीत का? असा उपरोधिक प्रश्न क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटलांना केला.
पुढे बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, "कुणाच्यातरी माध्यमातून असे व्हिडिओ बाहेर काढणं आपल्याला शोभतं का? दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपला बंगला काचेचा असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे" मी या व्हिडिओची तक्रार सायबर क्राईमला दिली आहे अशी माहिती क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कथित व्हायरल व्हिडिओच्या षडयंत्राविरोधात मी न्यायालयात जाणार अशीही भूमीका आमदार क्षीरसागर यांनी घेतली.