शिवसेनेकडे ‘कोल्हापूर उत्तर’सह पाच जागा घ्या ! पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कोल्हापूरच्या शिवसैनिकांची मागणी
मातोश्रीवर आढावा बैठक : कोल्हापूर उत्तरसाठी पदाधिकारी आग्रही
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तरसह शिरोळ, चंदगड, पन्हाळा-शाहूवाडी आणि राधानगरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) घ्या, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कोल्हापूरामधील शिवसैनिकांनी केली. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तरसाठी विशेष आग्रह धरला. यावर पक्षप्रमुख ठाकरे यांनी जागावाटपाबाबत चर्चा, बैठका सुरु आहेत. यामध्ये या पाच जागांची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच जागावाटपाबाबत निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांनी मशाल चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी कामाला लागावे असा आदेश दिला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदार संघांचा आढावा शिवसैनिकांकडून घेतला. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.
बैठकीमध्ये शिवसैनिकांनी कोल्हापूर उत्तरसाठी विशेष आग्रह धरला. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून पाच वेळा शिवसेनेचा उमेवार विजयी झाला आहे. पन्नास हजारहून अधिक शिवसेनेचा मतदार आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली. पक्षप्रमुखांचा आदेश प्रमाण मानून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचं रान केले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा विद्यमान आमदार असला तरी शिवसेनेचा हा हक्काचा मतदार संघ आहे. त्यामेळ कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे घ्या, जिंकून दाखवतो अशी हमी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी दिली. यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी उत्तरमध्ये जो उमेदवार देईन त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे रहायचे आहे, अशी सूचना केली.
कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिणच्या शिवसैनिकांनीही उत्तरच्या जागेसाठी आग्रह धरला. तसेच करवीर विधानसभा मतदार संघाच्या बैठकीत माजी जि.प.सदस्य बाजीराव पाटील यांनी करवीरमध्ये शिवसेनेचे 50 हजार मतदान आहे. येथून महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी शिवसैनिक ठामपणे राहतील. मात्र येथे निवडणुकीनंतर शिवसेनेला महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडून विचारात घेतले जात नाही. विधानसभेनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत करवीरमध्ये शिवसेनेला पन्नास टक्के वाटा मिळाला पाहीजे, अशी मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे पाटील यांनी केली.
एक लाख घरात मशाल चिन्ह पोहचवणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्ह घरोघरी पोहचविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार घटस्थापनेदिवशी ऐतिहासिक बिंदू चौक येथे मशाल प्रज्वलित करुन पुजन करणार आहे. यानंतर जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये मशाल चिन्ह पोहचविण्याची मोहिम हाती घेणार असल्याचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.