राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच विरोधक मोदींच्या विरोधात एकत्र; शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांवर टीका
पुलाची शिरोली/वार्ताहर
भारत देश हा विकसित व बलशाही देश बनवण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले .ते पुलाची शिरोलीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते .खासदार धनंजय महाडिक ,भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मकरंद देशपांडे, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, सत्यजित देशमुख भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, भाजपा एक परिवार आहे या परिवारामध्ये सर्व लोक आई-वडील व बहिण भाऊ या नात्याने एकत्रित काम करीत असतात . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश एक परिवार समजला आहे. हाच भारत देश प्रभावशाली, गौरवशाली, सुसंस्कृत व विकसित आणि महान बनवण्यासाठी व मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच कमळ चिन्ह व सर्वसामान्य लोकांच्या योजनांची माहिती घराघरात पोहचवण्यासाठी कामाला लागावे.
भारतीय जनता पक्षाला एक नेता ,एक वाक्यता, एक विचारधारा आहे. पण विरोधी इंडिया आघाडीला एक नेता नाही एक वाक्यता नाही प्रत्येक जण आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. अशी टिका त्यांनी इंडिया आघाडीवर केली. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. याबाबत बोलताना चौहान म्हणाले एकसंघ भारत देश तोडण्याचे महापाप काँग्रेस सरकारने विशेषतः गांधी घराण्याने केले आहे .आणि आता गांधी घराण्यातला एक सदस्य राहूल गांधी भारत जोडो यात्रा काढत फिरत आहे. त्यांच्या यात्रेला सर्व सामान्य जनतेने बेदखल केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर सोनिया गांधींनी थेट जनतेतून निवडणूक न लढवता राज्यसभेचा मार्ग धरला आहे. त्यामुळे त्या एवढा मोठा देश काय सांभाळणार? असा प्रश्न चौहान यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये भारताची मान शान जगात उंचावली आहे. प्रत्येक देश मोदींची वाहवा व कौतुक करत आहे. मोदींचे नेतृत्वाखाली काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यामुळे तेथे सध्या पर्यटन वाढले आहे. भारतातील दहशतवादाचे समूळ उच्चाटन मोदी यांनी केले. राम मंदिर निर्माण करून एका अर्थाने रामराज्य त्यांनी स्थापित केले आहे.
काँग्रेसने महिलांचा कधीही मान सन्मान केला नाही पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात महिलांना प्रत्येक क्षेत्रात चांगली वागणूक व मानाचे स्थान मिळत आहे. त्यामुळे महिला सशक्तिकरण, सामाजिक परिवर्तन व विकसित भारत देशासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत. यासाठी संपूर्ण देश निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे असे चौहान यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले काँग्रेसच्या युपीए सरकारने भ्रष्टाचार व घोटाळ्यांची मालिका सुरू केली होती. विकसित भारतासाठी मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत.त्यांनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी विकास कामांची मालिका सुरू केली आहे.त्यामुळे भारत हा गौरवशाली व प्रभावशाली देश बनण्यासाठी मोदींचे हात बळकट करूया. असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मिळावी.हि आमची मागणी केंद्रीय कमिटीकडे पोहचवावी अशी विनंती खासदार महाडिक यांनी शिवराजसिंग चौहान यांचेकडे केली.
माजी आमदार सुरेश हळवणकर म्हणाले इंडिया आघाडी म्हणजे साप आणि मुंगूस, उंदीर आणि मांजर हे प्राणी एकत्र येत नाहीत पण तसेच लोक या इंडिया आघाडीत एकत्रित आले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्वांचे राजकीय स्थान टिकावे. नाहीतर देशामध्ये मोदी नावाचा महापूर आला आहे या महापुरात आपण वाहून जाऊ अशी भीती त्यांना वाटत असल्यामुळे हे अनेक पक्षाचे लोक एकत्रित मोदींचे विरोधात आले आहेत.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मध्य प्रदेश मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असताना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना थांबण्याचा आदेश दिला व ते थांबले त्यांच्या जागी मोहन यादव हे मुख्यमंत्री बनले.
तसाच आदेश कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत सन २०२१ मध्ये आमचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे होते. त्यांच्या विरोधात माजी आमदार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला आणि अमल महाडिक यांनी बिनशर्त माघार घेतली व आमचे प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे संस्कृती व आदेशाचे पालन करणारा पक्ष व प्रत्येक कार्यकर्ता आहे. असे सौ. महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता उदाहरण दिले.
स्वागत व प्रास्ताविक भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले. आभार जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने (बापू )यांनी मानले.
या संवाद मेळाव्यास निशिकांत पाटील, अरुणराव इंगवले, अशोक स्वामी, प्रसाद खोबरे, भगवान साळुंखे, सम्राट महाडिक, विजय भोजे, राहुल महाडिक, शिरोली सरपंच सौ. पद्मजा करपे, भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, धनाजी पाटील, पिंटू करपे, योगेश खवरे यांच्यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते