For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवराज सिंह चौहानांना केंद्रात जबाबदारी?

06:07 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
शिवराज सिंह चौहानांना केंद्रात जबाबदारी
Advertisement

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासोबत खास बैठक : केंद्रीय कृषिमंत्रिपद मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भाजपमध्ये भूमिका नेमकी काय असणार या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहानांना पक्षनेतृत्वाने दिल्लीत बोलावून घेत खास चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज यांच्याविषयी पक्ष लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर शिवराज यांना कोणती जबाबदारी मिळणार यासंबंधी अनेक प्रकारचे कयास व्यक्त करण्यात येत आहेत.

Advertisement

शिवराज सिंह चौहान हे दिल्लीत कुठल्या नेत्यांना भेटणार याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तर मध्यप्रदेशातील अन्य मंत्र्यांच्या नियुक्तीविषयी दिल्लीत होणाऱ्या बैठकीविषयी आपल्याला कुठलीच माहिती नसल्याचे शिवराज यांनी अलिकडेच म्हटले होते.

शिवराज सिंह चौहान यांच्यासंबंधी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत. शिवराज यांच्यासारखा जनतेचे पाठबळ असलेल्या नेत्याला घरी बसविले जाऊ शकत नाही. पक्ष शिवराज यांच्यासंबंधी लवकरच निर्णय घेणार आहे. त्यांना निश्चितपणे नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. शिवराज यांना दिल्लीत जबाबदारी मिळणार का भोपाळमध्येच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार, हे मात्र नड्डायांनी स्पष्ट केलेले नाही.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या दिमाखदार विजयानंतर शिवराज यांना राष्ट्रीय राजकारणात जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याच्या उत्तरादाखल त्यांनी दिल्लीत जाणार नसल्याचे म्हटले होते.  पक्षाकडे स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मी मृत्यू बेहत्तर समजेन असे शिवराज यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटले होते.

शिवराज सिंह हे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या नाराजीमुळेच 17 डिसेंबर रोजी रात्री उशिरा भाजप नेत्यांच्या बैठकीत शिवराज सामील झाले नव्हते, असा युक्तिवादही करण्यात येत आहे. अशा स्थितीत पक्षनेतृत्वाने शिवराज यांना दिल्लीत बोलाविले आहे. न•ा यांच्या निवासस्थानी शिवराज सिंह चौहान यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. नरेंद्र तोमर यांनी केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याने शिवराज यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

भाजप आणि शिवराज यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. रविवारी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळावरून दिल्लीत पक्षाची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत अमित शाह आणि नड्डा यांच्यासोबत मध्यप्रदेश भाजपचे सर्व दिग्गज नेते सामील झाले होते, परंतु शिवराज यांनी मात्र या बैठकीपासून अंतर राखले होते. या बैठकीत मुख्यमंत्री मोहन यादव, प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, संघटन महामंत्री हितानंद, उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, भाजप महासचिव कैलास विजयवर्गीय यांच्यासमवेत नरेंद्र तोमरही सामील झाले होते.

Advertisement
Tags :

.