शिवराज राक्षे, सिकंदर शेखची बाजी
आटपाडी :
येथे सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे आणि महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख यांनी प्रतिस्पर्धी पंजाब आणि हरियाणाच्या मल्लाला आस्मान दाखवत विजय मिळविले. पै. शिवराजने एकछाक डावावर तर पै. सिकंदरने निकाल डावावर बाजी मारत आटपाडीचे कुस्ती मैदान गाजविले.
आटपाडी येथे बाजार समितीचे सभापती पै. संतोष पुजारी यांच्या वाढदिवसा निमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, विनायक मासाळ, तानाजी यमगर, बाळासाहेब मोटे, साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, राजेंद्र खरात, पै. रावसाहेब मगर, पै. राजेंद्र शिंदे, पै. नामदेव बडरे, पै. मोहन बडरे, पै. मारूती बडरे, राजेश नांगरे, मोहन पाटील, आत्माराम पाटील, दादासो जाधव, मुरलीधर माने आदिंच्या उपस्थितीत कुस्ती मैदानाचा शुभारंभ झाला.
पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पै. शिवराज राक्षे याने पै. भोला पंजाबी याच्यावर पट काढत एकछाक डावावर विजय मिळविला. महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख याने पै. जयदीप कुमार (हरियाणा) याच्यावर निकाल डावावर विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पै. वैभव माने यांनी कुर्डूवाडीच्या महारूद्र काळेल वर विजय मिळविला.
वीर हनुमान कुस्ती केंद्राचा पै. निनाद बडरे याने पै. ओंकार गायकवाड याच्यावर पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला. पै. जयदीप बडरे याने सांगलीच्या श्रीजीत पाटील याच्यावर विजय मिळवला. पै. सतीश मुढे आणि सांगलीचा पै. भोसले यांच्या तुल्यबळ लढत झाली. बेनापूर तालमीचा पै.नाथा पवार आणि बामणीचा पै. परमेश्वर गाडे यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. शेवटी ती कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तब्बल सहा तास चाललेल्या आटपाडीतील कुस्ती मैदानात लहान-मोठ्या 300 हुन अधिक कुस्त्या झाल्या. पै. प्रतिक गौंड, पै. विकास पवार, पै. बापू देशमुख, पै. सुजल देशमुख, पै. जय माळी, पै. सनी मदने, पै. शुभम माने, पै. सौरभ तांबवे, पै. अनिकेत ठोंबरे, विराज देशमुख या मल्लांनी चटकदार, प्रेक्षणिय कुस्त्या करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. पै. मयूर वाघमोडेने पुण्याच्या पैलवान कणसेवर विजय मिळविला.
आमदार सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील, उद्योगपती विनायक मासाळ, मनोज सरगर, सागर पाटील, मनोज नांगरे, अरविंद चव्हाण, रमेश पाटील, अंकुश भोसले, अमोल काटकर यांच्या उपस्थितीत कुस्त्या लावल्या. आमदार सुहास बाबर, तानाजी पाटील यांच्यासह उपस्थित पैलवानांनी पैलवान असलेल्या सभापती संतोष पुजारी यांना मैदानातच वेगळेपणाने वाढदिवस साजरा केला.
पै. मारूती जाधव, पै. किसन जाधव, अमोल मोरे, पै. विनोद वाक्षे, विजय देवडकर, प्रकाश पाटील, मिनीनाथ चव्हाण, सुभाष नाईकनवरे, दादासाहेब जाधव, वस्ताद राजेंद्र शिंदे, वस्ताद सुनील मोहिते, सुनील चंदनशिवे, पै. किसन शेळके, वस्ताद अमोल थोरवे, पै. प्रकाश कोळेकर, पै. बापू कोळेकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्ल, वस्ताद, प्रशिक्षकांनी कुस्ती मैदानाला हजेरी लावली. विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवुन गौरविण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, महाराष्ट्र चॅम्पियन मोहन बडरे व सहकाऱ्यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले. रात्री साडेदहा वाजेपर्यंत चाललेल्या कुस्ती मैदानाला शौकिनांचा मोठा प्रतिसाद लाभला.
मुलींच्या नेत्रदिपक कुस्त्या
आटपाडीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात मुलींच्याही प्रेक्षणीय कुस्त्या रंगल्या. त्यामध्ये वेदांतिका पवार हिने सिद्धी होळकर हिच्यावर, ऋतुजा जाधव हिने अनुराधा नाईक हिच्यावर विजय मिळविला. आंतरराष्ट्रीय पै. शिवानी करचे हिने साक्षी चंदनशिवे हिच्यावर, शिवानी कुंभार हिने सिमरन कोरी हिच्यावर विजय मिळवला. आटपाडीची महिला पैलवान रूचा चव्हाण हिने सोनाली नरळे हिच्यावर विजय मिळविला. महिला कुस्तीपटुंनी पुरूष मल्लांप्रमाणेच चटकदार कुस्त्या करून कौशल्य सिध्द केले.