अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी शिवराज काटकर
सावंतवाडी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष शिवराज काटकर यांनी पत्रकारांच्या विविध समस्या तसेच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील सुमारे ६०० पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
पत्रकारांच्या व्यथा, समस्या आणि विविध मागण्यांकडे शासनाकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याबद्दल परिषदेच्या मुख्य विश्वस्तांनी यावेळी खंत व्यक्त केली. पत्रकारांची एकजूट कायम ठेवत सर्वसामान्य पत्रकारांच्या हितासाठी पत्रकार परिषद अधिक सक्षमतेने कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
काटकर यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी आणि हिताच्या प्रश्नांवर जिल्हास्तरावर विशेष लक्ष देऊन आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा घेत नूतन अध्यक्ष शिवराज काटकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे आणि सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
विविध जिल्ह्यांतून आलेले पत्रकार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने मेळाव्याला उत्साहाचे वातावरण लाभले.