For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवकुमारांचे दिल्लीतच ठाण

06:12 AM Mar 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवकुमारांचे दिल्लीतच ठाण
Advertisement

पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी कसरत : मुख्यमंत्रिपदासाठी वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अधिकार हस्तांतरणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. राज्यात पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याने आपल्याला देखील संधी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हायकमांडकडे केली आहे. दोन दिवसांपासून शिवकुमार यांनी पुन्हा दिल्लीत ठाण मांडले आहे. सरकारच्या उर्वरित कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी त्यांनी हायकमांड स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

Advertisement

शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर दौऱ्यावर असताना हायकमांड सहमत असतील तर पुढील दोन अर्थसंकल्पही मीच मांडेन, असे वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ रविवारी कलबुर्गी येथून शिवकुमार एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमवेत दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत रविवारी रात्री शिवकुमारांनी वरिष्ठांची भेट भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ते दिल्लीतच आहेत.

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून मागील चार-पाच महिन्यांपासून वाद आहे. परंतु, हायकमांडने या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका किंवा निर्णय घेतलेला नाही. नेतृत्व बदलाबाबत सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्या गटातील नेत्यांकडून समर्थनार्थ आणि विरोधात उघडपणे वक्तव्ये होत आहेत. राज्य काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू झाले आहे. भोजनावळीच्या निमित्ताने आमदारांच्या बैठका होत आहेत. परंतु, हायकमांडने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

नेतृत्व बदलाबाबत कोणीही उघडपणे वक्तव्ये करू नयेत, अशी सक्त ताकीद काँग्रेस हायकमांडने आमदारांना दिली आहे. मात्र, अजुनही काही आमदारांनी आपापल्या नेत्याच्या बाजूने वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. सिद्धरामय्या यांनी देखील आपण हायकमांडच्या निर्णयाची कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवकुमार वरिष्ठांच्या भेटीनंतर मंगळवारी बेंगळूरला परतण्याची शक्यता आहे. शिवकुमारांच्या विनंतीला हायकमांड कसा प्रतिसाद देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोणाला भेटेन हे उघडपणे सांगू शकत नाही : शिवकुमार

मी दिल्लीत कोणाला भेटेन हे उघडपणे सांगू शकत नाही. सोमवारी अनेक बैठका असल्याने त्यात सहभागी होत आहे. आसाम  प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे, अशी प्रतिक्रिया डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारून 6 वर्षे पूर्ण होत आहेत, याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, होय, मला केपीसीसीचे अध्यक्षपद स्वीकारून 6 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पक्षातील आमदार, विधानपरिषद सदस्यांसाठी डिनर पार्टी आयोजित केली आहे. आणखी एक दिवस पराभूत उमेदवार, जिल्हा व ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांसाठी देखील भोजनावळीचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.