गडहिंग्लजला शिवजयंती उत्साहात साजरी; शिवचित्र रथाची शहरातून जल्लोषात मिरवणूक
गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज शहरासह तालुक्यात शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा अश्वारूढ पुतळा आणि शिवाजी चौकातील पुतळयाचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिवाय विविध ठिकाणाहून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत श्रीफळ, पान विढा देऊन मंडळाच्यावतीने करण्यात आले.
गडहिंग्लज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयासमोर मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. तसेच शिवजन्मोत्सवानिमित्त सकाळी पाळणा म्हणण्यात आला. यावेळी महिलांचीही मोठी उपस्थिती होती. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम, अनिल कुराडे, प्रा. शिवाजीराव भुकेले, नागेश चौगुले, वसंत यमगेकर, आप्पा शिवणे, संजय पाटील, रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, विद्याधर गुरबे, प्रकाश तेलवेकर, रामदास कुराडे, महेश कोरी, सागर पाटील, प्रतिक क्षीरसागर, राजू जाधव, कौसरअली मुल्लानी, डॉ. किरण खोराटे, श्री. सरदेसाई, स्वाती कोरी, मंजुषा कदम, स्नेहा भुकेले यांच्यासह समाजाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सकाळी छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्यावतीने शहरातून शिवचित्र रथाची मिरवणूक काढण्यात आली.
यामध्ये विद्यालयाचे विद्यार्थी पांरपारिक वेशात सहभागी झाले होते. विविध मंडळांनी घोषणा देत मिरवणुका काढल्या. शहरातील चौकातून प्रतिमा पूजन करण्यात आले होते. विविध संस्था, शाळा येथे ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी मराठा मंडळाच्यावतीने शहरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील सर्वधर्मिय, सर्वपक्षीय, कार्यकर्ते, शिवभक्त सहभागी झाले होते. मिरवणुकीत चित्ररथाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पारंपारिक वाद्यांसह डॉल्बीच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.