शिवदीप लांडे यांचा राजकारणात प्रवेश
माजी आयपीएस अधिकारी : बिहारमध्ये लढविणार निवडणूक
वृत्तसंस्था/ पाटणा
भारतीय पोलीस सेवतून स्वेच्छानिवृत्ती पत्करलेले अन् सिंघम नावाने प्रसिद्ध माजी अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाने नवा पक्ष स्थापन केला आहे. लांडे यांचा हा पक्ष यंदा होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार आहे. बिहारच्या 243 जागांवर उमेदवार किंवा चेहरा कुठलाही असो, प्रत्येक मतदारसंघात निवडणूक शिवदीप वामनराव लांडेच लढविणार आहे. पक्षाच्या उमेदवाराला पक्षाच्या विचारसरणीचे पालन करावे लागेल असे लांडे यांनी म्हटले आहे. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्राचे असले तरीही बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते आणि व्हीआरएस घेतल्यावर त्यांनी बिहार सोडून जाणार नसल्याची घोषणा केली होती.
आयपीएसची नोकरी सोडल्यावर मला राज्यसभा सदस्यत्वापासून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याच्या ऑफर मिळल्या, परंतु मी त्या सर्व नाकारल्या. युवांची दशा आणि दिशा बदलण्यासाठी मी हिंद सेना नावाने नवा पक्ष स्थापन आहे. 18 वर्षांपर्यंत गणवेशात बिहारची सेवा केल्यावर आता मी जनतेदरम्यान एका नव्या भूमिकेत येऊ इच्छितो. हिंद सेना पक्ष बिहारला बदलण्याचा आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काम करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
माझ्या पक्षाचे कार्यकर्ते संवेदनशील असतील आणि न्याय हेच आमचे तत्व आहे. आमचा पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्वांवर काम करेल आणि बिहारच्या जनतेचा आवाज होण्याचा प्रयत्न करेल असे उद्गार लांडे यांनी काढले आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लांडे यांनी नवा राजकीय पक्ष काढल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
2006 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी
2006 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी राहिलेले लांडे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल कयास वर्तविला जात होता. स्वत:च्या निर्भीड प्रतिमेसाठी प्रसिद्ध लांडे यांना बिहारमध्ये ‘सिंघम’ आणि ‘सुपरकॉप’ या नावांनी ओळखले जाते. त्यांनी पाटणा, पूर्णिया, अररिया आणि मुंगेर यासारख्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम करतेवेळी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते.