Ratnagiri : जनसेवेच्या भक्कम पायावर शिवानी सावंत रिंगणात
लोकसेवेचा वारसा पुढे नेत शिवानी सावंत थेट निवडणूक रिंगणात
चिपळूण : वहाळ जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ उमेदवारीची नसून जनसेवेच्या भक्कम कार्याची कसोटी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना-भाजप महायुतीकडून शिवानी संदीप सावंत यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही उमेदवारी म्हणजे गेल्या अनेक वर्षांत संदीप सावंत यांनी राबवलेल्या लोकाभिमुख आंदोलनांची आणि जनहिताच्या लढ्यांची थेट पावती मानली जात आहे.
स्थानिक तरुणांच्या नोकरीसाठी उभारलेला लढा असो, मुंबई-गोवा महामार्गासाठी केलेले आंदोलन असो, टेरव गावाच्या पाणीप्रश्नासाठी दिलेला संघर्ष असो किंवा रत्नागिरी जिह्यातील नमन लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न असोत, सावंत यांच्या प्रत्येक आंदोलनामागे जनहित हाच केंद्रबिंदू राहिला आहे. चिपळूण मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या प्रश्नावर थेट राज्य पातळीवर आवाज उठवत ठेकेदार बदलण्यापासून ते नव्या निविदा प्रक्रियेपर्यंतचा लढा यशस्वी करून दाखवण्याचे काम त्यांनी केले.
कोरोना महामारीच्या काळात तर संदीप सावंत यांनी अक्षरश: घराबाहेर राहून नागरिकांच्या सेवेसाठी स्व:तला झोकून दिले. त्या काळात दिलेले योगदान अनेक कुटुंबांसाठी जीवनदायी ठरले. या संपूर्ण प्रवासात शिवानी सावंत यांनी पत्नी म्हणून नव्हे तर समाजसेवेच्या सहप्रवासी म्हणून खंबीर साथ दिली. राजकीय संघर्षातून पतीवर उद्भवलेल्या मोठ्या प्रसंगालाही त्या धिरोदत्तपणे सामोरे गेलेल्या आहेत. आता संदीप सावंतांया त्याच सेवेचा वसा पुढे नेत शिवानी सावंत थेट निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांचे बळकटीकरण, ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन देण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वहाळ जिल्हा परिषद गटात महिला बचत गटांचे विस्तारित जाळे उभे करून हा गट जिह्यात आदर्श ठरवण्याची त्यांची स्पष्ट भूमिका आहे. राजकारण व्यवसाय म्हणून नव्हे तर लोकसेवेचे माध्यम म्हणून स्वीकारले आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत सावंत यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. महायुतीच्या नेतृत्वावर, पक्षावर आणि सावंत कुटुंबाच्या कामावर विश्वास ठेवून एक संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.