शिवकुमारांच्या हस्तक्षेपामुळेच मागील युती सरकार पाडले
रमेश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण : देवेगौडा मोठे नेते
बेळगाव : डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्यात केलेल्या हस्तक्षेपामुळेच युती सरकार पाडण्यासाठी आपणच पुढाकार घेतला होता, अशी माहिती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी दिली. पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांचे नेतृत्व आपण कधीच मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस-निजद युती सरकारच्या पतनाला सिद्धरामय्या कारणीभूत आहेत, असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना देवेगौडा माजी पंतप्रधान आहेत. ते खूप मोठे नेते आहेत. त्यांना उत्तर देण्याइतके आपण मोठे नाही.
मात्र, डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात केलेल्या हस्तक्षेपामुळे ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून युती सरकार पाडल्याचे त्यांनी सांगितले. वाल्मिकी समाजावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. वाल्मिकी समाज अनुसूचित जमातीत येत नाही, असे प्रमाणपत्र हुक्केरीच्या ग्रेड-2 तहसीलदारांनी दिले आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांच्यावर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात त्यांनी असे प्रमाणपत्र दिले आहे. ही गोष्ट गंभीर आहे. चुकीचे प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रेड-2 तहसीलदारांवर एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही रमेश जारकीहोळी यांनी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह अनेक नेते अहिंद चळवळीतून आलेले आहेत. वाल्मिकी समाज एसटी वर्गात मोडतो. असे असताना हुक्केरीच्या ग्रेड-2 तहसीलदाराने हा समाज एसटीत मोडत नाही, असे प्रमाणपत्र दिले आहे. हा तर समाजाचा अपमान आहे. त्यामुळे या प्रकाराविरुद्ध संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देतानाच ही गोष्ट आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेतृत्वाने लक्ष घालू नये
काँग्रेसमधील सद्य घडामोडींवर बोलताना या घडामोडींशी आपल्या पक्षाचा काही एक संबंध नाही. भाजप नेतृत्वाने यामध्ये लक्ष घालू नये, असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर डी. के. शिवकुमार भाजपमध्ये येतील का? या प्रश्नावर त्यांचे नेतृत्व मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना येऊ द्या, मग आपण आपला निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.