आज शिवकुमारांची मुख्यमंत्रिपदी निवड
सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्यी बैठकीत होणार निर्णय : शपथविधी सोमवारी शक्य
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला असून आता डी. के. शिवकुमार हे राज्य काँग्रेस सरकारची कमान सांभाळणार आहेत. शनिवारी सायंकाळी 4 वाजता बेंगळूरमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होणार आहे. तर सोमवार 1 जून रोजी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यावे, याबाबत हायकमांड स्तरावर अद्याप चर्चा सुरूच आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांबरोबरच मंत्रिपदी कोणकोण शपथग्रहण करतील, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींच्या सल्ल्यावरून कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी बेंगळूरात बोलावण्यात आली आहे. विधानसौधमध्ये सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार असून तेथे डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्याची प्रक्रिया पार पडेल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस समितीने पक्षाच्या आमदारांना बेंगळूरमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, विधानपरिषद सभागृह नेते एन. एस. बोसराजू व पक्षातील सर्व कार्याध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सहभागी होण्यासाठी पक्षाचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल व सुरजेवाला हे पक्षाचे निरीक्षक म्हणून सहभागी होतील.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार हे लोकसभवनमध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतील. याप्रसंगी ते नवीन मंत्रिमंडळ स्थापनेला परवानगी मिळविण्याकरिता सर्व काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करतील. तसेच नवे मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या शपथविधी वेळ देण्याची विनंतीही करतील.
डी. के. शिवकुमार हे सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. शपथविधी समारंभ विधानसौधसमोर होणार आहे. शिवकुमार यांनी शपथविधीसाठी शुभ मुहूर्ताबाबत आपल्या ज्योतिषांचा सल्ला घेतला आहे. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण कार्यक्रम पार पडणार आहे.
सिद्धरामय्यांनी वरिष्ठांचे मानले आभार
गुरुवारी सायंकाळीच दिल्लीला गेलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मंत्री के. जे. जॉर्ज यांनी शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळ पुनर्रचना, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, राज्यसभा निवडणूक व इतर मुद्द्यांवर काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन चर्चा केली. सिद्धरामय्या यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व वरिष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांची स्वतंत्रपणे भेट घेत मुख्यमंत्रिपदाबरोबरच तसेच आतापर्यंत दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानले.
मुलाला मंत्रिपद देण्याची विनंती
सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांच्या भेटीप्रसंगी पुत्र व विधानपरिषद सदस्य डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांची ओळख करून दिली. नव्या मंत्रिमंडळात मुलाला स्थान द्यावे, अशी विनंती त्यांनी केल्याचे समजते. मंगळवारी नवी दिल्लीत बैठकीवेळी हायकमांडने सिद्धरामय्यांना मुलाला मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सिद्धरामय्यांनी डॉ. यतिंद्र आणि राहुल गांधींना भेट घडवून आणली.
...अन् मंत्रिमंडळ बरखास्त
सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सादर केला होता. बुधवारी रात्री राज्यपाल थावरचंद गेहलोत कौटुंबीक कारणास्तव मध्यप्रदेशच्या इंदौरला गेले होते. गुरुवारी रात्री उशिरा ते बेंगळूरला परतले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी सिद्धरामय्यांचा राजीनामा स्वीकारून राज्य मंत्रिमंडळ बरखास्त केले. याबाबतचा अधिकृत आदेश लोकभवन कार्यालयाने जारी केला. त्यामुळे नवी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या सिद्धरामय्यांनी तेथील कर्नाटक भवनऐवजी खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य केले. दुपारचे भोजनही तेथेच डी. के. शिवकुमार, माजी मंत्री के. एच. मुनियप्पा, विधानपरिषद सदस्य डॉ. यतिंद्र यांच्यासोबत केले.
अद्याप निर्णय झालेला नाही!
राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शनिवार 30 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बैठक बोलावण्यात आली आहे. हायकमांडसोबत अद्याप चर्चा सुरू आहे. पक्षाच्या सर्व आमदारांना बेंगळूरमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्वकाही हायकमांडच्या सूचनेनुसार होत आहे. अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.
पूर्वीच्या करारानुसारच सिद्धरामय्यांचा राजीनामा : सतीश जारकीहोळी

हायकमांडसोबत झालेल्या पूर्वीच्या करारानुसार सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी काळातही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्ग आणि दलित) ध्वज पुढे नेला जाईल, असे माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेंगळूरमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्या नावाचा विचार केला जात असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हायकमांडशी चर्चा करून दिल्लीहून परतल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अंतिम निर्णय घेईल. जो निर्णय घेतला जाईल तो आम्ही स्वीकारू. मला अद्याप कळवण्यात आलेले नाही,. मंत्रिमंडळ स्थापनेबाबतची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. मी स्वत: कोणत्याही पदाचा इच्छुक नाही. चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. जेव्हा होईल, तेव्हा मी माझे मत मांडेन, असे ते म्हणाले.
किती उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाईल किंवा नाही, याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. माहितीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. शनिवारी संध्याकाळपर्यंत सर्व काही स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.