For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीडमध्ये शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची आत्महत्या; पोलिस तपास सुरू

11:26 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीडमध्ये शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची आत्महत्या  पोलिस तपास सुरू
Advertisement

बीड : दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Advertisement

शिवाजीराव शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध चर्चा सुरू असतानाच त्यांच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. आशुतोष शिंदे यांनी परळी ग्रामीण पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत, वडिलांनी शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

शिवाजीराव शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख होते. राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या माजी पदाधिकाऱ्याने शेतीतील नापिकीमुळे जीवन संपवल्याचा दावा समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालातून आत्महत्येबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर दादाहरी वडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :

.