शिवाजीनगर मराठी शाळेच्या शिक्षकाची बदली करू नये
गटशिक्षणाधिकाऱ्यांना म. ए. समितीचे निवेदन
खानापूर : खानापूर-शिवाजीनगर येथील मराठी शाळेच्या शिक्षकाची नियोजनपर मोदेकोप येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी बदली रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी देण्यात आले. शिवाजीनगर येथे पहिली ते पाचवी मराठी शाळा आहे. या शाळेत 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नियमानुसार दोन मराठी शिक्षक आणि एक कन्नड शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यातील एका शिक्षकाची मोदेकोप येथील शाळेत तीन दिवसासाठी नियोजनपर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच शिक्षकावर पाचही वर्गाची जबाबदारी पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
यासाठी नियोजनपर बदली करण्यात आलेल्या शिक्षकांची बदली रद्द करून शिवाजीनगर शाळेतच त्यांना कायम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी समितीच्या शिष्टमंडळाला आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदेकोप येथे पटसंख्या जास्त असल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तीन दिवस मोदेकोप येथे तात्पुरती बदली केली आहे. येत्या काळात योग्य नियोजन झाल्यास शिवाजीनगर शाळेला कायमस्वरुपी शिक्षक देण्याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, बाळाराम शेलार, जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, संजय पाटील हे उपस्थित होते.