Kolhapur News : कुलगुरूविनाच शिवाजी विद्यापीठाचा कारभार सुरु ; शैक्षणिक कारभारावर प्रश्नचिन्ह
शिवाजी विद्यापीठातील प्रभारी कुलगुरूंची निवड रखडली
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा कार्यकाळ सोमवारी संपला. मंगळवारी प्रभारी कुलगुरू व प्र-कुलगुरूंची निवड होईल असे बोलले जात होते. मात्र, निवडीबाबत दिवसभर शासनाच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. त्यामुळे प्रभारी कुलगुरू व प्र-कुलगुरू ठरेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दोन्ही पदाची निवड गुलदस्त्यात आहे. याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा आहे. निवडीबाबत शासन उदासिनता दाखवत असल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे. सोशल मीडियावरही चर्चेला उधान आले असुन निवड होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यपाल भवनाकडूनही अद्याप कोणत्याच हालचाली होत नसल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठ प्रशासनाला निवडीबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचेही समजते.
पद रिक्त राहण्याची नामुष्की
शिवाजी विद्यापीठात यापुर्वी कुलगुरू व प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधीच प्रभारी कुलगुरू व प्र-कुलगुरूंची निवड केली जात होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच ही दोन्ही पदे रिक्तच राहिली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कुलपती कार्यालयाकडून कुलगुरू शोध प्रक्रिया सुरू आहे. आता कार्यकाळ संपुनही दोन दिवसांचा कालावधी होत आला तरी निवड झाली नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, आज निवड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नवे कुलगुरूंची निवड होण्यास अजुन तीन ते चार महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रभारी कुलगुरूंवर जबाबदारी सोपविण्याचा नियम आहे. आता निवड होणाऱ्या प्रभारी कुलगुरूंच्या कालावधीत विद्यापीठाला नॅक मूल्यांकनाला सामोरे जावे लागणार आहे. एनआयआरएफ रैंकिंगची तयारी एनईपीच्या अंतिम टप्प्याची अंमलबजावणीही करायची आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेची माहिती असणाऱ्या कुलगुरूंकडे प्रभारीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.