कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातील ‘टॉप-50‘ राज्य विद्यापीठात शिवाजी विद्यापीठ

01:50 PM Sep 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जाहीर झालेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-2025) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 200 विद्यापीठांमध्ये स्थान कायम राखले आहे. तर राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत देशातील आघाडीच्या 50 विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त केले आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी दिली.

Advertisement

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2025 साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. सन 2016 पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ या क्रमवारीत देशातील 200 विद्यापीठात आहे. रँकिंगमध्ये सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वाढत असताना विद्यापीठाने आपले स्थान कायम राखले. या वर्षीही 151-200 या रँकबँडमध्ये स्थान कायम आहे.

गतवर्षीपासून ‘एनआयआरएफ‘ने राज्य सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यास सुरवात केली. त्यानुसार गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठ 51-100 या रँकबँडमध्ये होते. यंदा शिवाजी विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत 1-50 या रँकबँडमध्ये स्थान मिळवले आहे. देशातील आघाडीच्या 50 विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ आता 51.80 गुणांकनासह 45 व्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत महाराष्ट्रातील आणखी 3 विद्यापीठे आहेत. त्यात 11 व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 12 व्या स्थानी मुंबई विद्यापीठ आणि 43 व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न. विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे. संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषीपूरक क्षेत्रे, नाविन्यता, मुक्त, कौशल्य, राज्य सार्वजनिक आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचाही या क्रमवारीमध्ये समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवरील या क्रमवारीमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी नोंदविलेली आहे. गेल्या काही वर्षांत एनआयआरएफच्या निकषांनुसार विद्यापीठातील शिक्षक, संशोधकांसह सर्वच घटकांनी परिश्रम घेतले. त्याचे हे फलित आहे. या सर्वच घटकांचे मी अभिनंदन करतो. भविष्यातही त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणि यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
                                                                                                        -डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article