बनावट पदवी प्रमाणपत्र कठोर कारवाई कधी? शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी संघटनांचा सवाल
परीक्षा विभागावर पेपरफुटी, चुकीची प्रश्नपत्रिका आता बनावट प्रमाणपत्राचे संकट
अहिल्या परकाळे कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा विभाग पेपरफुटी, पेपरच्या फेरतपासणीत वाढलेले गुण, बी.कॉम.ची चुकीच्या प्रश्नपत्रिकेचा प्रश्न सुटतो न सुटतो, तोवर बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकाराने परीक्षेसारख्या महत्वाच्या विभागातच सारखे काही ना काही घडत आहे. परिणामी विद्यापीठाने दोषींवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे बनावट पदवी प्रमाणपत्रासारख्या प्रकरणात प्रशासन कठोर कारवाई कधी करणार?, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.
परीक्षा विभागातील काम अतिशय गोपनीय असते. तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याची घटना नुकतीस उघडकीस आली. क्रीडा विभागातील महिला खेळाडूच्या पालकांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगण्यात येते. तोपर्यंत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्यावरून प्रचंड गोंधळ झाला. हा प्रकार निस्तरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पेपर फेर तपासणीतही काही विद्यार्थ्यांचे गुण वाढल्याचे समोर आहे. यासंदर्भात कारवाई सुरू आहे, यापलिकडे काहीच उत्तर दिले जात नाही. या प्रकाराचा विसर पडतो न पडतो तोवर चीनसह अन्य ठिकाणी बनावट पदवी प्रमाणपत्र वापरल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यासंदर्भात परीक्षा विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. परंतु अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे बनावट पदवी प्रमाणपत्रासंदर्भात संबंधीतावर गुन्हा दाखल होण्याकडे नजरा लागल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे संकेतस्थळ काही काळापुरते हॅक केल्याचीही विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्वरीत गुन्हा नोंद करणे अपेक्षित होते. परंतु विद्यापीठ प्रशासन काय भुमिका घेणार, हे स्पष्ट होत नसल्याने विद्यापीठाच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरही विद्यार्थी संघटनांनी शंका उपस्थित केली आहे. क्रीडा विभागाने फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. परंतु संबंधीतावर काय कारवाई झाली, यासंदर्भात चित्र स्पष्ट नाही. परीक्षा विभागाकडे जवळपास दहा ते पंधरा बनावट प्रमाणपत्रांच्या तक्रारी आल्याची चर्चा आहे. तरीही परीक्षा विभाग कारवाई का करीत नाही, असा सवाल केला जात आहे.
एफआयआर दाखल करण्याचे क्रीडा व परीक्षा विभागाला आदेश
बनावट प्रमाणपत्रासंदर्भात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे आदेश परीक्षा विभाग व क्रीडा विभागाला दिले आहेत. विद्यापीठाचा लोगो वापरून बनावट पदवी प्रमाणपत्र तयार केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर दोषींवर कारवाई करण्यात येईल. कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)