शिवाजी मंडळ-पाटाकडीलच्या खेळाडूत राडा
फुटबॉलच्या अंतिम सामन्यावेळी घडला प्रकार : मारामारीच्या प्रकाराने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेला गालगोट, तणावाचे वातावरण, मारामारी करणाऱ्या दोन्ही संघाच्या खेळाडूंवर पोलिसांचा सौम्य लाठीमार, संघ समर्थकांनी एकमेकांना वाहिली शिव्यांची लाखोली
कोल्हापूर
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेअंतर्गत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात शिवाजी तरूण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ या संघातील खेळाडूंनी मैदानातच अखिलाडू वृत्तीचे दर्शन घडवत एकमेकांना मारामारी करण्याचा नाहक प्रकार केला. हा प्रकार पाहून शिवाजी मंडळाच्या समर्थकांनी पाटाकडीलच्या खेळाडूंच्या दिशेने आणि पाटाकडीलच्या समर्थकांनी शिवाजी मंडळाच्या खेळाडूंच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. पाहता पाहता मैदानात बाटल्याचा खच साटला. शिवाय दोन्ही संघाचे समर्थकांनी खेळाडूंना शिव्यांची लाखोली वाहिल्याने तणावाचे वातावरण झाले. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी थेट मैदानात उतरून आधी खेळाडूंना सौम्य लाठीमार करत भानावर आणत मैदानात जमलेल्या दोन्ही संघाच्या समर्थकांना हुसकावून लावले.
एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवाजी तरूण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ या संघामध्ये उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी रविवारी अंतिम सामना खेळवण्यात आला. छत्रपती शाहू स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाहण्यासाठी १५ ते १८ हजार फुटबॉल शौकिन उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने चुरस आणि ईर्ष्येने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने शिवाजी मंडळावर २-० गोलने आघाडी घेतली होती. परंतू सामना संपायला अखेरची ८ ते १० मिनिटे बाकी असतानाच शिवाजी मंडळाचा संकेत नितीन साळोखे व पाटाकडीलच्या ओंकार मोरे यांनी चेंडू जवळ नसताना एकमेकांना खेचाखेचीचा प्रकार केला. यात ओंकार अचानक जमिनीवर कोसळला. यानंतर कोणाला काही कळायच्या आतच पाटाकडील व शिवाजी मंडळाचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धाऊ लागले. अर्वाच्च भाषेत शिव्याही देत एकमेकांचा अंगातील टिशर्ट ओढू लागले आणि अचानकच खेळाडू एकमेकांना मारू लागले. याचवेळी शिवाजी मंडळाच्या समर्थकांनी पाटाकडीलच्या खेळाडूंच्या दिशेने आणि पाटाकडीलच्या समर्थकांनी शिवाजी मंडळाच्या खेळाडूंच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. अर्वाच्च भाषेत खेळाडूंना शिव्यात देत मारामारीच्या प्रकाराला समर्थकांनी खतपाणी घातले. या साऱ्या प्रकारामुळे मैदानासह संपूर्ण स्टेडियममध्ये तणावाचे वातावरण पसरले.
हा प्रकार पाहून स्टेडियममध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत मारामारी बवण्याची विनंती केली. परंतू खेळाडू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत शिवाजी मंडळ आणि पाटाकडीलच्या खेळाडूंवर सौम्य लाठीमार केला. मैदानात मारामारीला खतपाणी घालणाऱ्यांवर लाठीमार कऊन सर्वांना मैदानाबाहेर हुसकावून लावले. या साऱ्या प्रकारामुळे २० मिनिटे सामना थांबवावा लागला. नंतर सामन्याचे पंच, पोलिस व स्पर्धा आयोजक उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूची समजूत काढून पुन्हा सामना खेळवण्यात आला.
बंदी स्टेडियममध्ये पाण्याच्या बाटल्या....
फुटबॉल सामन्यात खेळाडूंमध्ये वादावादीचा प्रकार घडला की काही जण मैदानातच पाण्याच्या बाटल्या फेकतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून सतत हा प्रकार घडत आहे. यंदा असे होऊ नये म्हणून केएसएने फुटबॉल सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांना पाण्याची बाटली सोबत आणू नये, असे आवाहन केले आहे. परंतू तरीही शेकडो जण मुद्दाम पाण्याच्या बाटल्या स्टेडियममध्ये घेऊ येत असतात. आणि सामन्यात वादावादीचा प्रकार घडला की बाटल्या थेट खेळाडूंच्या दिशेने फेकतात. या प्रकाराला आवर कोण घालणार अशी सद्यस्थिती आहे.