For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी

11:05 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी
Advertisement

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हा दूरदृष्टी असणारा देशातला आजवरचा सर्वोच्च राजा होऊन गेला. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये जन्म घेतलेल्या या राजाने दर्यावर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे दुर्ग निर्माण केले. घाटमाथ्यावर राहणाऱ्या राजाला समुद्रात आपले तळ असावेत, हे कसे उमगले असेल? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते, असे विचार पुणे येथील शिवव्याख्याते डॉ. गणेश राऊत यांनी मांडले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी बोलताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. इंग्रज, डच, पोर्तुगीज, मोंगल आदी परकीय आक्रमक साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून हिंदुस्थानला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे छत्रपतींच्या लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी तंत्राचा वापर करत या सर्वांविरुद्ध विजयी आघाडी उघडली. जीवाला जीव देणारे मावळे घडविले. त्यामुळेच संकटकाळ मावळ्यांनी स्वत: झेलले. या काळात त्यांनी शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागू दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

मिठावर लावला कर

व्यापाराच्यादृष्टीने हिंदुस्थानात शिरकाव करण्याचा प्रयत्न इंग्रजांकडून होत होता. त्या काळी देशी मिठापेक्षा इंग्रजांचे मीठ अधिक स्वस्त होते. हे मीठ भारतात आले तर आपल्या मिठाला काहीच किंमत उरणार नाही, हे छत्रपतींच्या लक्षात येताच त्यांनी इंग्रजांच्या मिठावर त्या काळी जबर कर बसविला. त्यामुळे इंग्रजांचे मीठ हे भारतीय मिठापेक्षा महाग ठरले. त्यामुळे शिवरायांची दूरदृष्टी अशा प्रसंगांतून दिसून येते, असे राऊत यांनी सांगितले.

Advertisement

शिवराज्याभिषेक हा सर्वोत्तम सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केल्यास त्यातील शिवराज्याभिषेक सोहळा ही एक ऐतिहासिक घटना आहे. हा प्रसंग पुस्तकाच्या रुपाने येण्यासाठी ‘शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ हे पुस्तक लिहिले. अनेक जाती-धर्माचे, पंथांचे मावळे शिवाजी महाराजांसोबत कसे आले आणि राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला, याचे अभ्यासपूर्वक लेखन पुस्तकात केल्याचे प्रकाशक व संकलक अनिल पवार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.